‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिका शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल झाल्या असून पहिल्या दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत या दोन्ही मार्गिकांवरून ६४ हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला. मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या शनिवारपासून वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपासून सकाळी ५.२५ ते रात्री ११ या वेळेत या दोन्ही मार्गिकेवर पूर्ण क्षमतेने मेट्रो धावणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘मेट्रो २ अ’मधील वळनई – अंधेरी पश्चिम आणि ‘मेट्रो ७’ मधील गोरेगाव पूर्व – गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ४ वाजता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला. हा टप्पा सेवेत दाखल होताच दहिसर – अंधेरी पश्चिम अशी ‘मेट्रो २ अ’ आणि दहिसर – गुंदवली अशी ‘मेट्रो ७’ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागली. पहिल्या दिवशी या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा – सीआरझेडमध्ये झोपु योजनांना मान्यता देण्याची केंद्राची तयारी

एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर रात्री ८ वाजेपर्यंत २८ हजार ३८१ प्रवाशांनी, तर ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवरून ३५ हजार ६८४ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. एकूण दोन्ही मार्गिकेवर शुक्रवारी मेट्रोच्या २३६ फेऱ्या झाल्या आणि यातून ६४ हदार ०६५ जणांनी मेट्रो प्रवास केला. दरम्यान शुक्रवारी संपूर्ण मार्ग सेवेत दाखल झाला असला तरी दुपारी ४ नंतर मेट्रो धावू लागली. या मार्गिकांवर शनिवारी सकाळपासून मेट्रो धावू लागतील आणि रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहील. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – मुंबईत करोना काळात मोठा घोटाळा? संदीप देशपांडेंच्या दाव्याने खळबळ, २३ जानेवारीला देणार पुरावे!

दैनंदीन प्रवासी संख्येत मोठी वाढ

या दोन्ही मार्गिकांच्या पहिल्या टप्प्यातील दैनंदिन प्रवासी संख्या ३५ ते ४० हजार इतकी आहे. पण आता या मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून त्या ‘वर्सोवा-घाटकोपर मेट्रो १’ला जोडण्यात आल्या आहेत. परिणामी मेट्रोच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. त्यामुळेच, शुक्रवारी दैनंदिन प्रवासी संख्या ६४ हजारांवर पोहचली. ‘मेट्रो २ अ’मधून गुरुवारी १६ हजार ४०१ प्रवाशांनी प्रवास केला होता. तर शुक्रवारी ही संख्या ३५ हजार ६८४ इतकी होती. ‘मेट्रो ७’ची दैनंदिन प्रवासी संख्या गुरुवारी १४ हजार ६७५ इतकी होती. शुक्रवारी ती २८ हजार ३८१ वर पोहोचली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge response to metro 2a and metro 7 on the first day in mumbai mumbai print news ssb
First published on: 21-01-2023 at 12:38 IST