मुंबई : मोसमी पावसाचे मुंबईत आगमन झाल्यापासून झाडे – फांद्या पडणे, शॉर्ट सर्किट तसेच, घर, भिंती कोसळणे अशा दुर्घटना घडल्या आहेत. शिवडी येथील किडवाई पोलीस ठाण्यानजीकच्या खाजगी सोसायटीच्या आवारात काल रात्री ८.३० च्या सुमारास भलेमोठे झाड उन्मळून पडले. त्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी आहे. दरम्यान, चेंबूरमध्येही झाडाची फांदी पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाले आहेत.

मुंबईत सोमवारी पडलेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडल्याच्या दुर्घटना घडल्या. विक्रोळी पूर्वेकडे झाड पडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला दोन तीन दिवसही उलटले नाहीत तोच बुधवारी पुन्हा झाडाच्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवडी येथील किडवई पोलीस ठाण्यानजीकच्या अँगल को.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑपरेटिव्ह सोसायटीच्या आवारात असलेले भलेमोठे गुलमोहराचे झाड बुधवारी रात्री उन्मळून पडले. त्या झाडामुळे रस्त्यालगतच्या २ ते ३ वाहनांचे नुकसान झाले. तसेच, झाड चालत्या दुचाकींवर पडल्याने रमझान निषाद (२७), बाळकृष्ण कुराई (३३) हे दुचाकीस्वार जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ नजीकच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रमझान निषाद चा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, अन्य जखमीची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंबूरमध्ये देखील जैतवन उद्यानाजवळ बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झाडाची फांदी पडून दोन पादचारी जखमी झाले. हितेश शेरसाया (२२), जयेश बोरा (२२) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती डॉक्टरांनी दिली आहे.