सचिन वाझे प्रकरणी चर्चेत आणि पर्यायाने वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदत घेतली. “सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यास मी नकार दिला होता. सचिन वाझेचा रेकॉर्ड फारसा चांगला नव्हता. असं यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

फडणवीस म्हणाले, “आपल्या सर्वांना माहिती आहे की, जी घटना मुंबईत घडली. उद्योगपती मुकेश अंबनी यांच्या घरासमोर ज्याप्रकारे जिलेटीन कांड्याने भरलेली एक स्कॉर्पिओ आढळून आली व त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या सर्वांसमोर आहेत.  मनसुख हिरेन यांचा ज्या प्रकारे खून केला जातो. या सर्व गोष्टी मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासात या अगोदर कधीच घडल्या नाहीत. आम्ही ९० च्या दशकात राजकारणाचे गुन्हेगारीकरणाचा महराष्ट्रात अनुभव घेतला होता. तशाचप्रकारची परिस्थिती आणि आता तर संरक्षण करणारेच अशाप्रकारे गुन्हे करत असतील, तर मग संरक्षण कोण करणार हा प्रश्न आहे. ”

तसेच, “परमबीर सिंग व सचिन वाझे तर खूपच लहान नावं आहेत. यामागे कोण बड्या हस्ती आहेत, त्यांची नावं समोर यायला हवीत. सचिन वाझेंना वापरणारी माणसं सरकारमध्ये बसलेले आहेत, त्यांची चौकशी कोण करणार?” असा सवाल देखील फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही घडल्या नाहीत –

“पोलिसांच्या माध्यमातून एखादी गाडी ठेवली जाते. मनसुख हिरेन यांची हत्या केली जाते, अशा घटना महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर कधीही घडल्या नाहीत. मूळ प्रश्न आहे तो एपीआय सचिन वाझे यांना नोकरीत का घेतले गेले? त्यांना सेवेत घेण्याचा प्रस्ताव माझ्याही सरकारच्या काळात आला होता. पण, महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन तो प्रस्ताव आम्ही नाकारला. सचिन वाझे हे शिवसेनेत होते, प्रवक्ते होते. शिवसेनेतील अनेक नेत्यांसोबत त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. हायकोर्टाच्या आदेशाद्वारे निलंबित असताना देखील, करोनाचे कारण दाखवून सचिन वाझे यांना सेवेत घेतले गेले. अनेक लहान आरोप असलेले कोणतेही अधिकारी सेवेत परत घेतले गेले नाही, मात्र सचिन वाझे यांना घेताना थेट क्राईम इंटिलिजन्स युनिटमध्ये नियुक्ती देण्यात आली. सचिन वाझे यांना सीआययू प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून ठेवले गेले. मुंबईत डान्सबार चालविण्यासाठी खुली सूट आणि सार्‍यांचे प्रमुख सचिन वाझे होते.”

मनसुख यांच्या हत्येचा तपास सुद्धा एनआयएने हाती घ्यावा –

“मनसुख हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याची जी माहिती दिली, तेव्हा त्यांची तक्रार प्रारंभी घेण्यात येत नव्हती. पण, तेथेही सचिन वाझे यांनी संबंधित पोलीस ठाण्याला फोन करून तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. मनसुख यांची सलग तीन दिवस चौकशी सुद्धा सचिन वाझे यांनीच केली. त्यानंतर त्यांच्याकडून एक तक्रार सुद्धा लिहून घेतली.”

“मनसुख हिरेन यांची हत्या झाली, असे आमचे म्हणणे आहे. या हत्या प्रकरणात एटीएसकडून ज्या पद्धतीची कारवाई अपेक्षित तशी होताना दिसून येत नाही. एटीएस आणि एनआयए यांच्याकडे अशा काही टेप्स आहेत, ज्यात वाझे आणि मनसुख यांचे संभाषण आहे. मनसुख यांच्या हत्येचा तपास सुद्धा एनआयएने घ्यावा, अशी आमची मागणी आहे.हे पोलिसांचे नाही, तर सरकारचे अपयश आहे. सरकार त्यांचा सभागृहात बचाव करीत होती. ज्या उद्देशाने त्यांना सीआययूमध्ये आणण्यात आले, त्याच्या उद्देशाची सुद्धा चौकशी व्हावी. पोलिस आयुक्तांची तर बदली केली.पण, सचिन वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. असं फडणवीस पत्रकारपरिषदेत म्हणाले आहेत.”