‘वक्ता दशसहस्रेषु’ ठरण्यासाठी तज्ज्ञांनी दिला साधनेचा मूलमंत्र
वक्तृत्वाच्या जोरावर शाब्दिक लढाया जिंकायच्या तर मुळात वक्त्याची स्वत:ची वैचारिक बैठक पक्की असायला हवी. त्यासाठी स्पर्धेतील विषय मिळाल्यानंतर संदर्भासाठी अभ्यास सुरू करण्यापेक्षा विचारांची साधना हा रोजच्या जगण्याचा भाग झाली पाहिजे. वैचारिकतेची जोपासना, अभ्यास म्हणजे वक्त्याची साधना! या साधनेतील सातत्यानेच माणसाचे विचार पक्के होत जातात आणि मग समोर कोणताही विषय आला तर त्याची उत्तरे बाहेर धुंडाळत राहण्यापेक्षा नवनवीन विचार सुचू लागतात आणि विचारांची मांडणी करणे ही सोपी प्रक्रिया होते, असा मूलमंत्र ‘वक्ता दशसहस्र्ोषु’च्या आठ वक्त्यांना गवसला.
महाराष्ट्राला ज्वलंत वैचारिक परंपरा होती, असे म्हणताना आजची पिढी विचारच करत नाही का?, असा प्रश्न सहज पडू शकतो. मात्र, आजची पिढीही या वैचारिकतेचा वारसा पुढे नेणारी आहे, हे लक्षात आणून देणारी, राज्याचा ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ निवडून देणारी ‘लोकसत्ता’ आयोजित आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. राज्यातील आठ प्रमुख शहरांमधून प्राथमिक आणि विभागीय फेरीचे आव्हान पूर्ण करून महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांचे अंतिम वाग्युद्ध रविवारी रवींद्र नाटय़गृहात रंगणार आहे. मात्र अंतिम लढाईसाठी सज्ज होत असतानाच या आठ वक्त्यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी नेमके काय करायला हवे, याचे मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

loksatta
या कार्यशाळेत नाटय़दिग्दर्शक अजित भुरे, प्रख्यात निवेदक धनश्री लेले आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या आठ वक्त्यांना मार्गदर्शन केले.
‘आपले विचार दुसऱ्यांना पटवून द्यायचे तर मुळात आपण त्या विचारांशी, मतांशी ठाम असले पाहिजे. हा ठामपणा आपल्या अभ्यासातून येतो. कोणताही विषय हातात पडल्यानंतर त्यावर आपले मत काय आहे हे पहिल्यांदा तपासून घेतले पाहिजे. दुसऱ्यांची त्या विषयावरची मते जाणून घेण्यापेक्षा मला काय वाटते, मला काय माहिती आहे या प्रामाणिक विचाराने सुरुवात करा. अन्यथा आपण खोटय़ा शब्दांच्या झुली चढवत राहतो आणि आपल्या विचारांमधील फोलपणा समोरच्याला सहज लक्षात येतो,’ अशा शब्दांत वक्त्यांच्या वैचारिक मांडणीतला गोंधळ त्यांच्या भाषणावर कशा पद्धतीने पाणी फिरवतो हे अजित भुरे यांनी आपल्या आजवरच्या अनुभवकथनांतून स्पर्धकांना लक्षात आणून दिले. केवळ स्पर्धेपुरता अभ्यास मर्यादित न ठेवता खोलवर अभ्यास केला तर आतून विचार स्फुरतील, तो तुमचा आतला आवाज, तुमचे मत तुम्ही त्याच ठामपणे लोकांसमोर पोहोचवू शकाल. ही प्रक्रिया सोपी नाही तर सततच्या अभ्यासाने येणारी आहे हेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर कधीही दुसऱ्यांच्या मताधिक्याखाली राहू नका, असा स्पष्ट सल्लाही त्यांनी दिला.
उत्कृष्ट, प्रभावी आणि रसाळ वाणी हे उत्तम वक्त्याचे शस्त्र मानले तर मुळातच वाणीचे प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी या चारही संकल्पनांनुसार विचारांची सुरुवात ते व्यक्त होण्यापर्यंतची प्रक्रिया कशी असते हे धनश्री लेले यांनी विस्ताराने स्पर्धकांना समजावून सांगितले. गिरीश कुबेर यांनीही या वेळी स्पर्धकांशी सहज संवाद साधला. दिलेल्या विषयाच्या दोन्ही बाजू आपल्या भाषणातून मांडणे ही पारंपरिक पद्धत झाली. मात्र ते विचार वक्त्यांमध्ये रुजलेले नसल्याने ही मांडणी खोटी वाटते, असे स्पष्ट मत कुबेर यांनी व्यक्त केले. सादरीकरणाऐवजी आपल्याला लोकांना काय द्यायचे आहे तो मजकूर महत्त्वाचा असून त्यासाठी सातत्याने ज्ञान मिळवण्याची तयारी असली पाहिजे. वक्तृत्व हा जगण्याचा एक भाग आहे. त्यामुळे उत्कृष्ट वक्तृत्वासाठी वैचारिक साधना आवश्यक असते. संदर्भग्रंथ वाचून स्पर्धा जिंकता येतात. मात्र आयुष्याची स्पर्धा जिंकण्यासाठी वैचारिक साधनेतील, अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे असते, असा मूलमंत्र कुबेर यांनी स्पर्धकांना दिला.
या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना, स्पर्धेतील यश हे तात्पुरते असून त्याच्या पलीकडेदेखील एक जग आहे. ‘सितारोंके आगे जहाँ और भी है’ या पंक्तीप्रमाणे पलीकडच्या जगाचा शोध, त्याची आस लागणे आनंददायी असते आणि हा शोधच तुम्हाला पुढे घेऊन जातो, हे सांगताना सध्याच्या तरुणांच्या विचारप्रक्रियेमध्ये जाणवणाऱ्या गोंधळाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. या पिढीने आपल्या विचारांचा आतला गाभा सकस होण्यासाठी अभ्याससाधना केली पाहिजे. मोठय़ा धावपट्टीची सवय ठेवली तरच उड्डाणदेखील मोठे घेता येईल, हे सांगतानाच त्यासाठी रोजच्या अभ्यासाचे महत्त्व त्यांनी वेगवेगळे दाखले देत स्पर्धकांना समजावून सांगितले. या कार्यशाळेच्या माध्यमातून केवळ स्पर्धेपुरती नव्हे तर ध्येयपूर्तीची वाटचाल कशी असायला हवी, याचा गुरुमंत्रच मार्गदर्शकांनी दिला.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

स्पर्धक म्हणतात..

वैचारिक प्रगल्भता जितकी महत्त्वाची तितकेच तिचे सादरीकरणदेखील महत्त्वाचे असते. सादरीकरणाच्या अनुषंगाने आमच्याकडून ज्या चुका होत होत्या त्या तपासून त्या दुरुस्त करण्यासाठीचे काम या कार्यशाळेतून झाले.आमच्या वक्तृत्वाला चकाकी मिळवून देण्याचे काम या वेळी करण्यात आले. या कार्यशाळेचा मला भविष्यातही फायदा होईल.
– विनया बनसोडे, अहमदनगर</strong>

कार्यशाळेतून खूप शिकायला मिळाले. आजच्या तिन्ही सत्रांतून कसे बोलावे, कशावर बोलावे यापेक्षा का बोलावे अशा अनेक प्रश्नांची उकल या कार्यशाळेच्या माध्यमातून झाली. खरे तर व्यक्त होणे ही एक साधी गोष्ट आहे, पण बऱ्याचदा आपण स्वत: व्यक्त होऊ शकत नाही. मात्र जिंकण्यापेक्षा चांगल्या प्रकारे व्यक्त होणे महत्त्वाचे असल्याची शिकवण कार्यशाळेतून मिळाली.
– आदित्य जंगले, मुंबई

आमच्या भागात जास्त स्पर्धा होत नाहीत, पण इथे मिळालेला अनुभव खूप समृद्ध करणारा आहे. या वेळी आम्हाला दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत मिळालेले मार्गदर्शन गावाकडील मित्र-मैत्रिणींना सांगेन, कारण त्यामुळे त्यांच्याही ज्ञानात भर पडेल. अशा दर्जात्मक स्पर्धामध्ये सहभागी होऊन मिळणाऱ्या अनुभवातून खूप शिकायला मिळते.
– अर्चना राजपूत, औरंगाबाद</strong>

आतापर्यंत भरपूर वक्तृत्व स्पर्धाचा अनुभव मिळाला, मात्र या कार्यशाळेतून मिळणारा अनुभव खूप मोठा होता.आयुष्याची स्पर्धा जिंकणे महत्वाचे असते. वक्ता म्हणून जो विचार करावा लागतो तो मान्यवरांच्या मार्गदर्शनाने मिळाला. वेगळ्या विषयावर बोलणे हे आव्हानात्मक असले तरी त्यातला अनुभव वेगळा असल्याने मिळेल त्या विषयावर बोलण्याची तयारी आहे.
– विवेक चित्ते, नाशिक

स्पर्धेपेक्षा कार्यशाळेची उत्सुकता जास्त होती. वक्तृत्वाचे जे काही गुण आमच्यात आहेत त्यांचा विकास व्हायला या कार्यशाळेचा खूपच उपयोग झाला. यामुळे वक्तृत्वाचा परीघ किती मोठा आहे याची जाणीव झाली. गिरीश कुबेरांनी सांगितल्याप्रमाणे विचार महत्त्वाचा, मात्र त्याहून तो विचार व्यवस्थित मांडता येणे महत्त्वाचे हा मूलमंत्र मिळाला.
– निखिल कुलकर्णी, पुणे

या कार्यशाळेतून खूप चांगला अनुभव मिळाला. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमुळे नृत्य, संगीत या कलांप्रमाणे ‘वक्तृत्व’ या कलेलादेखील एक वलय निर्माण होत आहे. युवकांसाठी व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. अजित भुरे आणि धनश्री लेलेंसारख्या उत्तम वक्त्यांना ऐकता आले ही मोठी पर्वणी ठरली.
– रिद्धी म्हात्रे, ठाणे</strong>

सुरुवातीला खूप दडपण आले होते. स्पर्धकांशी बोलल्यावर वाचन व अनुभवाच्या पातळीवर आपण मागे असल्याची जाणीव झाली. मात्र कार्यशाळेमुळे मला आत्मविश्वास आला. वक्तृत्व एक कला आहे, तिचाही रियाज करावा लागतो. त्यामुळे वाचन वाढवणे, स्वत:चे मत सादर करणे अशा अनेक गोष्टी या कार्यशाळेतून शिकायला मिळाल्या.
-ऋषिकेश डाळे, रत्नागिरी

व्यासपीठ व व्यासपीठाच्या खाली आपण सर्वचजण बोलत असतो, मात्र त्या बोलण्यामध्ये काय विचार असावा याचे कार्यशाळेतून विवेचन मिळाले. याचा उपयोग फक्त स्पर्धेपुरता नसून कौशल्याच्या पलीकडे जाऊन आतला विचार समोरच्यापर्यंत कसा पोहोचवायचा याचे ज्ञान या कार्यशाळेतून मिळाले.
– भुवनेश्वरी परशुरामकर, नागपूर

 

महाअंतिम फेरीचे विषय
* भाषेचा ‘लोच्या’
* माझी धर्मचिकित्सा
* लैंगिकतेपलीकडले मैत्र
* आमची राजकीय कुचंबणा
* समाजमाध्यम विरुद्ध वृत्तपत्रे
* वेगळं व्हायचंय मला!
* बंदी.. सक्तीचा सरकारनामा
* ऑनलाइन ऑफलाइन