मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गतच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) राबविण्यात येत असलेल्या एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्) आणि एमसीए (मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता ३१ जुलै २०२५ पर्यंत https://forms.epravesh.com/MumbaiUniversity/

या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतील. सुधारित तारखांनुसार विद्यार्थ्यांच्या सरावासाठी २ ऑगस्ट २०२५ रोजी सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेण्यात येणार असून ३ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने मुख्य प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे.

दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठीचा तपशील विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये आणि ई-मेल आयडीवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. एमएमएस आणि एमसीए हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांसाठीची पात्रता, शुल्क, प्रवेश परीक्षेसंबंधातील अधिक तपशील मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.