मुंबई : जे.जे. रुग्णालयाच्या केंद्रीय प्रयोगशाळेत २४ तास सर्व वैद्यकीय तपासण्या होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही वैद्यकीय तपासणीसाठी पर्यायी प्रयोगशाळेकडे डॉक्टरांनी पाठविल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अयोग्य आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात तपासण्या होत असताना रुग्णाला बाहेर पाठविल्यास संबंधित डॉक्टरवर कारवाईचा बडगा उगारण्यासंदर्भात काही शिफारशी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केल्या आहेत.

जे.जे. रुग्णालयात औषधे, वैद्यकीय साहित्य, रक्तचाचण्या उपलब्ध असतानाही डॉक्टर रुग्णांना या गोष्टी बाहेरून विकत घेण्यासाठी आणि चाचण्या करण्यासाठी चिठ्ठी लिहून देत असल्याच्या तक्रारी रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या प्रकाराला आळा घालण्यासाठी डॉ. अजय भंडारवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

हेही वाचा – नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हानाचे प्रकरण : जप्त मतदान यंत्र पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात

कोणतीही वैद्यकीय तपासणी कोणत्याही निवासी डॉक्टर किंवा रुग्णालयाच्या कोणत्याही प्राध्यापकाने खाजगी प्रयोगशाळेत पाठवू नये, असे आढळल्यास संबंधित डॉक्टरवर कारवाई करावी, अशी शिफारस समितीने केली आहे. मात्र अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्व वैद्यकीय साहित्य रुग्णालयात उपलब्ध असावे आणि सर्व वैद्यकीय तपासण्या रुग्णालयाच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेत २४ तास करणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे निकाल योग्य वेळी उपलब्ध करण्याची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे. तसेच केंद्रीय प्रयोगशाळेत होत नसलेल्या तपासण्यांसाठी रुग्णांना निवडक पर्यायी प्रयोगशाळेकडेच पाठवावे, अशी शिफारस समितीने केली आहे. दरम्यान, रुग्णालयातच सुविधा उपलब्ध असतानाही निवासी डॉक्टर किंवा प्राध्यापकाने रुग्णाला तपासण्या करण्यासाठी बाहेर पाठविल्यास संबंधितांवर कोणती कारवाई करावी यासंदर्भातही समितीने शिफारस केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचवले प्राण

समितीने केलेल्या अन्य शिफारशी

  • निवासी डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये सर्व साहित्य व तपासण्या उपलब्ध असताना बाहेरून साहित्य आणण्यासाठी किंवा खासगी प्रयोगशाळेत रुग्णाला तपासणीसाठी पाठवल्याचे प्रथमदर्शनी आढळल्यास संबंधित निवासी डॉक्टरवर लेखी नोटीस बजावण्यात येईल. त्यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेतला त्याचे स्पष्टीकरण समाधानकारक असल्यास प्रकरण तेथेच थांबवावे.
  • स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास अशा निवासी डॉक्टरांना भविष्यात अशा कृत्यांची पुनरावृत्ती न करण्यासाठी सूचना पत्र जारी करण्यात येईल.
  • पुन्हा असा प्रकार घडल्यास संबंधित डॉक्टरकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्या डॉक्टरांविरोधात पाच तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमून त्याची चौकशी करावी. तसेच संमतीने परिस्थिती बघून कारवाई संदर्भात निर्णय घ्यावा.