मुंबईः रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ‘ गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही ‘गोल्डन अवर’ महत्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार कराल तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचविणे आणि परत मिळविणे सोयीचे होते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विनाविलंब १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

सायबर जनजागृती मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, व्हीजेटीआयचे डॉ. फारुक काझी, ‘आयआयटी’ मुंबईचे प्रा. मंजेश हनवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हे टाळणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा होण्याबरोबरच आर्थिक तोटा टाळणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, कृत्रिम बुध्दिमत्तेच्या वापरामुळे फिशिंग, ओटीपी फसवणूक, डीपफेक, आवाज व चेहरा क्लोनिंग अशा नवीन तंत्रांचा गैरवापर करून सामान्य लोकांना फसवले जात आहे. सोशल मीडिया, ऑनलाईन व्यवहार, पेमेंट्स यामध्ये आपण माहिती देतो. कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. यावरून घोटाळे, खंडणी, सायबर बुलिंग यासारखे प्रकार घडतात.

राज्यात जागतिक स्तराची सायबर सिक्युरिटी लॅब, प्रतिसाद केंद्रे आणि नियामक यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे फसवणुकीनंतर तत्काळ कारवाई करून नुकसान कमी करता येते. मात्र यासाठी वेळेवर तक्रार होणे महत्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानच धोका असून त्यावर तंत्रज्ञान हाच उपाय आहे. डीपफेकसारख्या आव्हानांवर आपली क्षमता वाढविणे गरजेचे आहे. कोणताही डिजिटल गुन्हा त्याचा डिजिटल फिंगरप्रिंट मागे ठेवतो. त्यामुळे क्षमता आणि जनजागृती दोन्ही समान महत्त्वाचे आहेत. युवकांपर्यंत सायबर सुरक्षिततेबाबत माहिती पोहोचवणे आवश्यक असून, या कार्यात कम्युनिकेटर्सची महत्वाची भूमिका आहे, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

तर नागरिकांना सजग ठेवण्यासाठी आणि त्यांचे त्वरित संरक्षण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उल्लेखनीय जनजागृती मोहीम सुरू केली आहे. देशातील प्रत्येक मोठ्या रेल्वे स्थानकावर दररोज सायबर सुरक्षा सूचना दिल्या जात आहेत. लाखो नागरिक हे संदेश दररोज त्यांच्या दैनंदिन जीवनात ऐकत आहेत. राज्य पोलीस यंत्रणाही जनजागृतीची गरज ओळखून महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सखोल जनजागृती मोहीम राबवत असल्याचे रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

अभिनेता अक्षय कुमारचा अनुभव

ऑनलाईन गेम खेळतांना आपली मुलगी केवळ सतर्कतेमुळे सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यातून वाचल्याचा अनुभव या वेळी चित्रपट अभिनेता अक्षय कुमार यांनी सांगितला.

आपल्या मुलीवर बेतलेला प्रसंग त्यांनी या वेळी कथन केला. काही महिन्यांपूर्वी आपली अल्पवयीन मुलगी मोबाईलवर ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळत असताना तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला या अज्ञात व्यक्तीने ऑनलाईनवर मुलीशी संपर्क साधून आधी तिच्याशी मैत्री केली. तिला गेम खेळण्यासाठी मैत्रीपूर्ण आणि प्रोत्साहनात्मक संदेश पाठविले होते. मुलगा की मुलगी अशी विचारणा केली. मुलगी सांगितल्यावर तिला तिचा नग्न फोटो पाठवण्यास सांगितले. पण मुलीने ताबडतोब मोबाईल फोन बंद केला आणि घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीच्या सतर्कतेमुळे ती सायबर गुन्हेगारांना बळी पडण्यापासून वाचल्याचेही सांगत अक्षय कुमार यांनी राज्यातील इयत्ता ७ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये सायबर जागरूकतेचे धडे देण्याची मागणी केली.