मुंबई : घरगुती वापरातील वातानुकूलित यंत्रणेमधून (एसी) होणारी गॅस गळती आणि त्यामुळे यंत्रणेत भरावा लागणारा गॅस (रिफिलिंग) यामुळे देशभरातील वापरकर्त्यांना दरवर्षी तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर वातानुकूलित यंत्रणेमुळे वातावरणावरही गंभीर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष ‘आय फॉरेस्ट’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

दिल्ली, चेन्नई, कोलकाता, जयपूर, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या सात प्रमुख शहरांमधील तब्बल ३ हजार १०० घरांमध्ये यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. भारतात वातानुकूलित यंत्रणेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असल्याचे सर्वेक्षणादरम्यान आढळून आले. तसेच सुमारे ४० टक्के वातानुकूलित यंत्रणेत दरवर्षी गॅस भरला जातो. परिणामी, वापरकर्त्यांना २०२४ मध्ये वातानुकूलित यंत्रणेत केवळ गॅस भरण्यासाठी २७ हजार कोटी रुपये खर्च करावे लागले. तर ५२ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन झाले. दरम्यान, योग्य ती माहिती आणि काळजी घेऊन वातानुकूलित यंत्रणेचा वापर केल्यास २०३५ पर्यंत ५०० ते ६५० दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन टाळता येऊ शकेल, तसेच वापरकर्त्यांचा खर्चही वाचेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणानुसार, भारतात २०२५ मध्ये वातानुकूलित यंत्रणेची संख्या ७६ दशलक्ष असून २०३५ पर्यंत ती तिपटीने वाढून २४५ दशलक्ष इतकी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जवळपास ८० टक्के घरांमधील वातानुकूलित यंत्रणा पाच वर्षांपेक्षा अधिक काळ जुनी आहे. तसेच ४० टक्के वातानुकूलित यंत्रणा दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यातही १.५ टन क्षमतेची यंत्रे सर्वाधिक (७४ टक्के) आहेत. वापरकर्ते उर्जा कार्यक्षमतेबाबत सजग असून ९८ टक्के नागरिकांकडे ३ – ५ रेटिंगची वातानुकूलित यंत्रणा आहे, तसेच ६७ टक्के कुटुंबे वातानुकूलित यंत्रणा २३ अंशापेक्षा जास्त तापमानावर वापरतात.

गॅस भरण्यासंबंधी जनजागृतीचा अभाव

वातानुकूलित यंत्रणेमध्ये गॅस भरण्यासंबंधीच्या जनजागृतीचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरवर्षी ४० टक्के गॅस भरला जातो. २०२४ मध्ये ३२ हजार टन गॅस भरण्यात आला. त्यासाठी वापरकरर्त्यांनी तब्बल २७ हजार कोटी रुपये खर्च केले. यामुळे ५२ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन झाले.

मुंबईची स्थिती काय ?

  • मुंबईतील ९५ टक्के घरांमध्ये केवळ एकच वातानुकूलित यंत्रणा आहे. तर ५ टक्के घरांमध्ये दोनपेक्षा जास्त वातानुकूलित यंत्रणा आहे. सरासरीपेक्षा हे प्रमाण ८७ टक्क्यांनी अधिक आहे.
  • मुंबईतील २६ टक्के कुटुंब वातानुकूलित यंत्रणा २० अंशापेक्षा कमी तापमानावर ठेवतात. जे सरासरीपेक्षा ९ टक्के आणि अन्य शहरांपेक्षा जास्त आहे.
  • ३५ टक्के कुटुंबाकडे ५ तारांकीत वातानुकूलित यंत्रणा आहे.
  • मुंबईत सरासरी दररोज ३ तासापेक्षा अधिक काळ वातानुकूलित यंत्रणेचा वापर केला जातो.

एसीच्या मागणीत वाढ

वातानुकूलित यंत्रणेच्या मागणीत २०२० नंतर प्रचंड वाढ झाली आहे. पुढील १० वर्षांमध्ये त्यात तिपटीने वाढ होईल, असे अहवालात नमूद केले आहे. पण वातानुकूलित यंत्रणेचे योग्य व्यवस्थापन व वापर न केल्यास ते वातावरणाला हानीकारक ठरू शकते असेही अहवालात म्हटले आहे.