भव्यदिव्य घोषणा आणि पोकळ झगमगाट यापेक्षा नियमानुसार कामे करण्यावर आपला भर राहिला असून अगदी निवडणुकीच्या काळातही लोकप्रिय घोषणांऐवजी नियमात बसतील आणि जनहिताला प्राधान्य देतील असेच निर्णय माझ्याकडून घेतले जातील, अशा ठाम शब्दांत आपल्या मुख्यमंत्रिपदाचा तिसरा वर्धापनदिन साजरा न करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले मनोगत ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
दिल्लीच्या राजकारणात रमलेल्या पृथ्वीराज यांना तीन वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास सांगितले तेव्हा त्यांना स्वत:लाही धक्का बसला होता. सरळमार्गी, नियमानुसारच काम करण्याचा दंडक, कोणाचे हितसंबंध जपायचे नाहीत हा खाक्या आणि प्रचलित अर्थाने लोकप्रियतेचा अभाव असतानाही त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले गेल्याने अनेक प्रस्थापित नेते नाराज झाले होते. महाराष्ट्रात ते प्रभावशून्य ठरतील अशीही खात्री अनेकांना होती. आता त्याकडे पाहताना ‘दिल्लीतून मुंबईत येऊन स्थिरस्थावर होण्याचे मोठे आव्हान होते,’ अशी प्रांजळ कबुली चव्हाण यांनी या मुलाखतीत दिलीच. पण त्याच वेळी आगामी काळात विधानसभा निवडणुका लढवण्याचा इरादा स्पष्ट करून भविष्यातली दिशाही स्पष्ट केली.
या मुलाखतीत बिघडलेले राजकारण, न घडवणारे शिक्षण, राष्ट्रवादीबरोबर नांदताना तयार होणारे ताणतणाव आणि आघाडीचे सरकार चालवण्याचे आव्हान यावर त्यांनी अत्यंत मोकळेपणाने आपली मते मांडली. ‘‘महाराष्ट्राचे नेतृत्व आपण स्वीकारले तेव्हा प्रशासन जवळपास कोलमडून पडले होते. त्याला योग्य दिशा दिली नसती तर दोन वर्षांत पूर्ण राज्यच कोलमडले असते. अशा वेळी काही कठोर निर्णय घ्यावे लागले. यातून काही जणांचे हितसंबंध दुखावले गेले. तेव्हा त्यांच्याकडून टीका होणे साहजिकच आहे,’’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांची संभावना केली. महाराष्ट्रात सरकारी व्यवस्थेत शिस्तीचा अभाव होता. तेव्हा ती शिस्त लागावी आणि सरकारी कारभारात पारदर्शकता येऊन भ्रष्टाचाराला वाव मिळू नये, हा आपला प्रामाणिक प्रयत्न होता आणि आहेही, असे चव्हाण म्हणाले. ‘‘अमलात आणता येणार नाहीत, हे माहीत असतानाही निवडणुका आहेत म्हणून उगाच मोठमोठय़ा घोषणा करायच्या आणि नंतर पाठ फिरवायची हे माझ्याकडून होणार नाही. मी जे काही निर्णय घेतले त्यामागे केवळ जनहिताचाच विचार होता आणि आगामी निर्णयांतही तोच विचार असेल,’’ इतक्या ठामपणे पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कार्यशैलीचे समर्थन केले.
*सहकाराने जेवढे नेत्यांचे भले केले तेवढे राज्याचे आणि जनतेचे केले नाही.
*आपल्यावर दिरंगाईचा आरोप होतो, कारण काहींच्या स्वार्थी कामांकडे दुर्लक्ष केले म्हणून.
*आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार.
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2013 रोजी प्रकाशित
टीकाकारांकडे दुर्लक्ष करून जनहितालाच प्राधान्य
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अचानक महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास सांगितले तेव्हा
First published on: 10-11-2013 at 03:45 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ignoring criticism focused welfare of public cm