ब्रिक्स देशांतील विद्यापीठांची क्रमवारी जाहीर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातील शिक्षणसंस्थाची क्रमवारी जाहीर करणाऱ्या ‘क्यूएस’ संस्थेने जाहीर केलेल्या ब्रिक्स राष्ट्रांतील शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने नववे स्थान पटकावले आहे. बंगळूरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (आयआयएससी) दहाव्या स्थानावर आहे. देशातील साधारण ४५ शिक्षणसंस्थांना या क्रमवारीत पहिल्या दोनशे संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे.

क्यूएस या संस्थेकडून जगातील उच्चशिक्षण संस्थांची पाहणी करण्यात येते. संस्थांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थी आणि शिक्षकांचे गुणोत्तर, परदेशी विद्यार्थ्यांकडून मिळणारा प्रतिसाद, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकरीच्या संधी अशा विविध घटकांचा आढावा घेऊन उच्चशिक्षण संस्था आणि विद्यापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. क्यूएसकडून ब्रिक्स राष्ट्रांतील संस्थांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये आयआयटी मुंबईने शंभरपैकी ८३.६ गुण मिळवून नववे स्थान पटकावले आहे. गेल्यावर्षी आयआयटी मुंबईचे स्थान या क्रमवारीनुसार तेरावे होते. बंगळूरु येथील आयआयएससीने यंदा दहावे स्थान पटकावले आहे. आयआयटी दिल्ली (१७), मद्रास (१८), कानपूर (२१), खरगपूर (२४) आणि दिल्ली विद्यापीठ (४१) यांनी पहिल्या पन्नास विद्यापीठांमध्ये स्थान मिळवले आहे.

‘क्रमवारीत मिळालेले स्थान हे आयआयटी मुंबईच्या गुणवत्तेचे द्योतक आहे. अध्यापन आणि संशोधन अशा दोन्ही घटकांमध्ये संस्थेची कामगिरी उंचावत आहे. सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे,’ असे आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी सांगितले.

चीन आघाडीवर

या क्रमवारीसाठी ब्राझील, चीन, भारत, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधील साधारण नऊ हजार शिक्षण संस्थांचा विचार करण्यात आला होता. त्यामध्ये चीनमधील विद्यापीठे आघाडीवर आहेत. चीनमधील सिंगुआ युनिव्हर्सिटी, पेकिंग युनिव्हर्सिटी, फुदान युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही चार विद्यापीठे पहिल्या चार क्रमांकावर आहेत.

आयसीटी, मुंबई, पुणे विद्यापीठ पिहल्या दोनशेमध्ये वेगवेगळ्या गोंधळांसाठीच मुंबई विद्यापीठ सातत्याने चर्चेत असले तरी ब्रिक्स देशांतील शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत विद्यापीठ ८२ व्या स्थानावर आहे. याशिवाय राज्यातील पहिल्यांदाच आयसीटी मुंबईला आंतरराष्ट्रीय क्रमवारीत स्थान मिळाले असून ही संस्था ११८व्या स्थानावर आहे. ‘पहिल्यांदाच आयसीटीला स्थान मिळाले आहे. संस्थेची कामगिरी अधिकाधिक चांगली होत आहे. येत्या काळात अधिक चांगली कामगिरी करण्याचे प्रयत्न करण्यात येतील,’ असे आयसीटीचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी सांगितले. पुण्यातील सिंबायोसिस इन्स्टिटय़ूट १४४ व्या स्थानावर आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iit bombay breaks into top 10 brics list at 9th position
First published on: 24-11-2017 at 01:42 IST