वधू-वर सूचक संकेतस्थळावरून संपर्क साधून २२ तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पायधुनी पोलिसांनी (मुंबई) हैदराबाद येथून अटक केली होती. आरोपीने फसवणूक करण्याच्या हेतूने सात तरुणींशी लग्न केल्याचं चौकशीत कबूल केलं आहे. त्यातील काहींवर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचाही संशय आहे. आरोपी इम्रानअली खान हा मूळचा हैदराबादचा रहिवासी असून त्याने मुंबई, धुळे, सोलापूर, परभणी, कोलकाता, लखनऊ येथील अनेक तरुणींना फसवलं आहे. तसेच सात तरुणींशी लग्न करून त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडले आहेत. एका ४२ वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर पायधुनी पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला हैदराबादमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलीस चौकशीत त्याने सात लग्न केल्याचं आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळ्याचं कबुल केलं आहे.

एका ४२ वर्षीय तक्रारदार महिलेने २०२३ मध्ये वधू-वर सूचक संकेतस्थळावर स्वत:ची माहिती दिली होती. त्यानंतर संकेतस्थळाकडून काही मुलांची माहिती महिलेला देण्यात आली होती. त्यात हैदराबाद येथील इम्रानअली खान याचीही माहिती तिला देण्यात आली होती. तक्रारदार महिलेने इम्रानशी संपर्क साधला असता त्याने आपण बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याचे सांगितलं. इम्रानने १० मे २०२३ रोजी अचानक त्या महिलेला दूरध्वनी केला. इम्रान त्या महिलेला म्हणाला, मी माझ्या मित्रांना आपल्याबाबत सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना आता तुझ्याकडून पार्टी हवी आहे. असं सांगून इम्रानने त्या महिलेकडून एक हजार रुपये ऑनलाइन मागवून घेतले. काही दिवसांनी तक्रारदार महिलेने इम्रानला आईला भेटण्यासाठी मुंबईत येण्यास सांगितलं. त्यावेळी आपले पैसे काही ठिकाणी अडकल्याचं सांगून त्याने मुंबईत येण्यासाठी महिलेकडून १० हजार रुपये मागवून घेतले.

मुंबईत काही दिवस राहिल्यानंतर आरोपी इम्रानअलीने भायखळा येथे एक भूखंड खरेदी करायचा असून त्यासाठी महिलेकडून १५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वन विभागाची जमीन खरेदी केल्याप्रकरणी पोलिसांनी आपल्याला अटक केली असून त्या जामिनासाठी व इतर गोष्टींसाठी आरोपीने आणखी रक्कम घेतली. तक्रारदार महिलेने एकूण २१ लाख ७३ हजार रुपये इम्रानअलीला दिले. ही रक्कम आरोपीने परत न करता महिलेची आर्थिक फसवणूक केली.

हे ही वाचा >> “मी मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, पंतप्रधान मोदींची रोखठोक भूमिका

आरोपीने मुंबईतील १० ते १२ मुलींसह परभणी, धुळे सोलापूर येथील महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे. चौकशीत आरोपीने सात तरुणींशी विवाह करून त्यांची फसवणूक केल्याचं कबूल केलं. त्यातील आरोपीने कोलकाता, लखनऊ, दिल्ली आणि देहरादून येथील महिलांनाही फसवल्याचा संशय असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीचा मोबाईल तपासल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की, तो इतरही अनेक तरुणींच्या संपर्कात होता.