मुंबई : भारतीय रुग्णांसाठी खास तयार केलेल्या कॅन्सर उपचार संशोधनात आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी मोठी झेप घेतली आहे. संस्थेने देशातील पहिली ‘कॅन्सर टिश्यू बँक’ उभारली असून तिच्या मदतीने डॉक्टर व वैज्ञानिक रुग्णांच्या कॅन्सर पेशींचे थेट विश्लेषण करून उपचारांची निवड करू शकतील.

यापूर्वी उपचारांची निवड ही रुग्णावर औषधांची थेट चाचणी करून, किंवा परदेशी नमुन्यांवर आधारित माहिती वापरून केली जात होती. मात्र आता प्रयोगशाळेतच रुग्णांच्या पेशींपासून ऑर्गॅनॉईड्स (अवयवासारखे पेशीगट) तयार करून, त्यावर वेगवेगळ्या औषधांची परिणामकारकता तपासता येणार आहे. यामुळे उपचार निवडण्याची प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि कमी खर्चिक होणार आहे.

आयआयटी मद्रासने आतापर्यंत देशातील विविध रुग्णालयांतून ७,००० हून अधिक कॅन्सर पेशींचे नमुने संकलित केले आहेत. त्यात तोंडाचा कॅन्सर, पोट व आतड्यांचा कॅन्सर, स्वादुपिंडाचा (पॅन्क्रियाज) कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर इत्यादींचा समावेश आहे. मागील सात वर्षांत या टीमने कॅन्सरच्या जीनोम (जनुकीय रचना) व प्रोटीन क्रमांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करून त्यातील बदल (म्युटेशन्स) शोधले आहेत. भारतातील रुग्णांसाठी खास तयार झालेल्या या टिश्यू बँकेद्वारे कॅन्सर पेशींपासून नवीन औषधांची चाचणी, बायोमार्कर (रोग ओळखणारे घटक) शोधणे, रक्त तपासण्या, प्रयोगशाळेत तयार केलेले ऑर्गॅनॉईड्स (अवयवसदृश पेशीगट) तयार करणे, अशा अनेक गोष्टी शक्य होतील. यामुळे रोगाची कारणे ओळखणे आणि योग्य उपचार ठरवणे स्वस्त व जलद होईल. आयआयटी मद्रासच्या टीमने आतापर्यंत जवळपास सात हजार नमुने गोळा केले असून त्यात विविध प्रकारच्या कॅन्सर रुग्णांच्या पेशी आहेत. मागील सात वर्षांत या टीमने विविध कॅन्सरच्या जीनोमचा सखोल अभ्यास केला आहे.

परदेशातील डेटा भारतीय रुग्णांसाठी पूर्णपणे लागू होत नाही. कारण काही कॅन्सर प्रकारांमध्ये भारतीय रुग्णांमध्ये वेगळ्या प्रकारचे ‘फाउंडर म्युटेशन’ म्हणजेच विशिष्ट समुदायात मोठ्या प्रमाणात आढळणारे जनुकीय बदल आढळतात. या म्युटेशन्सचा वापर करून स्क्रीनिंग (लवकर निदान) व टार्गेट थेरपीज (लक्ष्यित उपचार) विकसित करता येतात.ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे डॉ. अरुण सिंग म्हणाले, भारतातील नमुन्यांवर आधारित ही पहिलीच टिश्यू बँक असून ती कॅन्सर संशोधनाला व उपचारांना नवी दिशा देईल. यामुळे कोणत्या औषधांवर रुग्णांचा प्रतिसाद चांगला येईल हे ठरवणे सोपे होईल.

आयआयटी मद्रासचे संशोधक रक्तातील नमुन्यांमधूनही बायोमार्कर्स व लक्ष्य शोधण्याचे काम करीत आहेत. यामुळे पॅन्क्रियाजसारख्या अतिशय वेगाने वाढणाऱ्या व आक्रमक कॅन्सरचे अचूक व लवकर निदान करता येईल.संशोधकांच्या म्हणण्यानुसार, स्तनाचा कॅन्सर, विशेषतः ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सर, भारतीय महिलांमध्ये अधिक आक्रमक असतो. त्यामुळे उपचार निवडताना भारतीय नमुन्यांवर आधारित डेटा महत्त्वाचा ठरणार आहे.प्रा. महाजन म्हणाले, “आम्ही आमच्या स्वतःच्या नमुन्यांवर आधारित नवे बायोमार्कर्स व टार्गेट्स शोधत आहोत. यामुळे वैयक्तिकृत उपचार विकसित करता येतील. हे रुग्णांसाठी अधिक सुरक्षित, अचूक आणि परिणामकारक ठरेल. हा अभ्यास विशेषतः पॅन्क्रियाज, गॅस्ट्रोइंटेस्टिनल व तोंडातील कॅन्सरसारख्या कॅन्सरमध्ये हे उपयुक्त ठरेल.संशोधक रक्तातून मिळणारे बायोमार्कर्सही शोधत आहेत. यामुळे पॅन्क्रियाज कॅन्सरचा लवकर व अचूक शोध घेणे शक्य होईल.