मुंबई : शिवडी येथील रामटेकडी परिसरातील एका गृहसंकुलातील जुने पिंपळ वृक्ष मुळापासून कापण्यात आले आहे. सोसायटीने जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने हे झाड तोडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. महापालिकेची फसवणूक करून झाड कापण्यासाठी परवानगी मिळवल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे. मात्र पालिका प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
रामटेकडी परिसरातील लोढा अरिया या गृहसंकुलाच्या आवारातील एक पिंपळ वृक्ष सोसायटीने यंत्राच्या सहाय्याने कापून हटवला आहे. तब्बल पाच फुटांचा घेर असलेला व ३० फूट उंच जुना वृक्ष कापल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी संशय व्यक्त केला आहे. माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी याप्रकरणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवले आहे. ‘सोसायटीच्या आवारात असलेले पुरातन पिंपळ वृक्ष सोसायटीने जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने गुपचूपपणे तोडला आहे. त्यासाठी महानगरपालिकेची फसवणूक करून परवानगी घेतली आहे.
ही परवानगी देताना उद्यान खात्याच्या अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्पर वृक्षसंवर्धन कायद्यानुसार कार्यपद्धतीचे पालने केले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणतेही वृक्ष कापण्यासाठी आपली परवानगी आवश्यक असून जनतेच्या माहितीकरीता वृक्षावर नोटीस लावणे आवश्यक असतानाही तसे न करता परस्पर परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बेकायदेशीर वृक्ष हत्येबाबत सदर सोसायटीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी.
मुंबई शहरातील प्रत्येक वृक्ष वाचविणे ही आपली जबाबदारी असून विनाकारण बेकायदेशीररीत्या वृक्षतोड थांबविण्यासाठी कठोर कार्यप्रणालीचा अवलंब करण्याचे आपण निर्देश द्यावेत व संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे.
दरम्यान, याबाबत उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे पिंपळ वृक्ष धोकादायक स्थितीत उभे होते म्हणून ते पाडण्यासाठी परवानगी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षक भिंतीसारख्या एका छोट्याशा बांधकामावर या पिंपळाच्या झाडाचे खोड वाढत होते. हे बांधकाम पडले तर झाडही पडले असते. त्यामुळे झाड कापण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच नियमानुसार एका झाडाच्या बदल्यात दोन झाडे आवारात लावण्याची अट पिंपळ वृक्ष तोडण्याची परवानगी देताना घालण्यात आली आहे.