मुंबई : शिवाजीनगर येथील बैंगनवाडी परिसरातील एका ४३ वर्षीय महिलेने आजारपण आणि गरीबीला कंटाळून आपल्या सहा महिन्यांच्या बाळाची उशीने तोंड दाबून व गळा आवळून हत्या केली. शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्गावरील कारखान्याबाहेर एका महिलेने दुसऱ्या महिलावर चाकूने हल्ला केल्याची माहिती टिळकनगर पोलिसांच्या निर्भया पथकाला गुरुवारी संध्याकाळी मिळाली. पोलीस निरीक्षक मनिषा कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत आरोपी महिलेने कोणत्याही कारणाशिवाय पीडित महिलेवर चाकूने हल्ला केल्याचे कबूल केले. मात्र पुढील चौकशीत तिने अधिक खळबळजनक माहिती दिली. त्या दिवशी दुपारीच तिने आपल्या सहा महिन्यांच्या मुलाची घरात झोपलेला असताना उशीने तोंड दाबून आणि नंतर गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले. ही महिला बैंगनवाडीत आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती.

टिळकनगर पोलिसांनी याबाबत तात्काळ शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित घरात जाऊन खात्री केली असता महिलेने सांगितल्याप्रमाणे मुलाचा मृतदेह झोपाळ्यात आढळला. पोलिसांनी बाळाचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या घटनेमागील दुःखद पार्श्वभूमी समजली. संबंधित महिलेने याआधी तीन वेळा लग्न केले होते, मात्र तिला तिन्ही पतींनी सोडून दिले. त्यानंतर तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. त्या नात्यातून ती गर्भवती झाल्यानंतर तोही महिलेला सोडून पळून गेला.

सहा महिन्यांपूर्वी या महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर आई व बाळ दोघांनाही गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आणि वैद्यकीय खर्च वाढल्याने, ती मानसिकदृष्ट्या खचली होती. त्यातूनच तिने बाळाची हत्या करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्वतःला इजा न करता, फक्त बाळाचा जीव घेतल्याचे तिने कबूल केले. शिवाजीनगर पोलिसांनी तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुलाचा अंतिम शवविच्छेदन अहवाल अद्याप प्रलंबित आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.