सुहास जोशी

शहर आणि महानगर परिसरातून स्थलांतरीतांचा ओघ सुरुच असून गेल्या १० दिवसांत ठाण्यातून सुमारे ५३ हजार स्थलांतरीतांनी एसटीने राज्याच्या सीमेपर्यंत प्रवास केला. एसटीची सुविधा मोफत असली तरी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून ठाण्यापर्यंतच्या प्रवासासाठी खासगी वाहने अवाच्या सवा पैसे आकारत असून, एसटी न मिळालेल्या स्थलांतरीतांना ठाण्यातील माजिवडा येथील पदपथ, उड्डाणपूलाखालील मोकळ्या जागी रात्र घालवावी लागत आहे.

राज्य शासनाने १० मे पासून स्थलांतरितांना राज्याच्या सीमेपर्यंत मोफत सोडण्याची सुविधा सुरू केल्यानंतर इतर वाहनांचा प्रवास कमी झाला. मुंबई आणि महानगर परिसरातील सर्व स्थलांतरीतांना ठाणे ते भिवंडी बाय पास या टप्प्यात एसटीचे ११ सुविधा थांबे तयार करण्यात आले. एसटीच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर, उपनगराच्या कानाकोपऱ्यातून स्थलांतरीत ठाण्यात येत असल्याने शहरातील माजिवडा नाक्याला एखाद्या मोठय़ा एसटी स्थानकाचेच स्वरुप आले आहे.

गेल्या आठवडय़ात येथून दिवसाला सुमारे १५० बसगाडय़ा निघायच्या. या आठवडय़ात हे प्रमाण दुप्पट झाले असून, मंगळवारी ३८७ बसगाडय़ा सोडण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर १० मे ते २० मे दरम्यान एकूण ५२ हजार ९८७ स्थलांतरीतांनी एसटीने राज्याच्या सीमेपर्यंत प्रवास केल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई – ठाणे प्रवासासाठी मोठा खर्च

स्थलांतरीतांसाठी ठाण्यातून एसटी सुटतात याची माहीती पसरल्याने मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोंढे ठाण्याकडे येऊ लागले आहेत. मुंबई ते ठाणे प्रवासासाठी खासगी वाहने अवाच्या सवा पैसे आकारत आहेत. एका २५ जणांच्या समूहाने वांद्रे येथून टेम्पोने ठाणे गाठण्यासाठी पाच हजार रुपये मोजले. तर कफ परेड ते ठाणे अशी तीन जणांच्या टॅक्सीसाठी १५०० रुपये द्यावे लागले. इतके पैसे मोजूनदेखील अनेकांना मुंबईच्या वेशीवरच सोडले जाते आणि पुढील प्रवास पायी करावा लागतो. त्यामुळे मुंबईतूनच एसटी बसगाडय़ा सोडण्याची मागणी या स्थलांतरितांनी केली.

ठाणे – उन्नाव प्रवास मोफत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटीने राज्याच्या सीमेपर्यंत सुविधा सुरू केल्यानंतर पुढील टप्प्यातील प्रवासाच्या सुविधा सुरुवातीच्या काळात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. मात्र गेल्या आठवडाभरात या सुविधा व्यवस्थित उपलब्ध झाल्या असून श्रीराम रावत या प्रवाशाने १५ मे रोजी ठाण्याहून सुरू केलेला प्रवास १७ मे रोजी उन्नाव येथे पूर्ण झाला. मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश राज्यांच्या सीमेवर प्रचंड गर्दी असल्याने त्या ठिकाणी बसगाडी उपलब्ध होण्यास लागणारा वेळ वगळता प्रवासात कोणताही अडथळा आला नसल्याचे त्यांनी सांगितले. सर्व राज्यात जेवणखाण्याची सुविधा स्वयंसेवी माध्यमातून होत असल्याने या संपूर्ण प्रवासात त्यांना कसलाही खर्च करायची गरजच पडली नाही.