अमर सदाशिव शैला

पूरग्रस्तांना मदत, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन आणि महत्त्वाच्या आयोजकांची माघार यामुळे गेल्या आठवडय़ात निरुत्साहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवाचा परिणाम यंदा मातीची मडकी बनवणाऱ्या कुंभ उत्पादकांवर झाला. मडक्यांच्या विक्रीवर यंदाच्या दहीहंडीत सुमारे ५० ते ६० टक्के परिणाम झाल्याने विक्रीअभावी शिल्लक राहिलेल्या आणि खास दहीहंडीसाठी तयार केलेल्या मातीच्या मडक्यांचे काय करायचे, हा प्रश्न त्यांना पडला आहे.

दहीहंडी उत्सव दरवर्षी मोठय़ा उत्सवात मुंबई शहर आणि उपनगरात साजरा केला जातो. मात्र या वर्षी कोल्हापूर आणि सांगली भागातील पूरग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी मोठय़ा दहीहंडी उत्सवाला फाटा देत त्यासाठी खर्च होणारी रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे यंदा मुंबईत दहीहंडीचा जोर कमी होता. राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही माघार घेतल्याने मंडळांमध्येही उत्साह नव्हता. बऱ्याच ठिकाणचा दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने आधीच मडक्यांची विक्री कमी झाली होती. ऐन दहीहंडीच्या दिवशी मडक्यांची विक्री होईल या आशेवर असलेल्या कुंभ उत्पादकांची मात्र निराशा झाली. त्यांनी उत्सवासाठी तयार केलेली बहुतांश मडकी तशीच पडून असून आता त्यांचे करायचे काय, असा प्रश्न आहे.

‘दरवर्षी दहीहंडीच्या आसपास तीन हजार मडक्यांची विक्री करत असे. या वर्षी फक्त एक हजार मडकीच विकली गेली. त्यामुळे उरलेल्या दोन हजार मडक्यांचे काय करायचे, हा प्रश्न पडला आहे,’ अशी व्यथा भावेश बाडेल यांनी मांडली. त्यांची मातीची मडकी सध्या गोदामात पडून आहेत. त्यांना ती पुढील वर्षांपर्यंत सांभाळून ठेवायची असतील तर गोदामाचे प्रत्येक महिन्याचे चार हजार रुपये याप्रमाणे भाडे अदा करावे लागणार आहे. एका मडक्याचे ५० रुपये याप्रमाणे उरलेल्या मडक्यांची किंमत एक लाख रुपये आहे. त्यातून साठवणुकीचा खर्च वगळता विक्री करून हाताला किती लागतील हा प्रश्नच आहे, अशा शब्दांत बाडेल यांनी आपली अडचण मांडली.

व्यवसाय कमी झाल्याची खंत

‘परराज्यातून स्वस्तात तयार केलेली मडकी मुंबईत येत असल्याने आधीच आमचा व्यवसाय कमी झाला आहे. या वर्षी खूप पाऊस असल्याने आधीच मडकी बनवण्यात अडचणी सहन कराव्या लागल्या. त्यात गेल्या वर्षीचा माल पडून आहे. यंदाही मंदी असल्याने ती ठेवायची कुठे, असा प्रश्न पडला आहे. मी दरवर्षी खार बाजाराजवळ दहीहंडी दिवशी २०० ते २५० मडकी विकत असे. या वर्षी १०० मडक्यांची विक्री करणेही जिकरीचे झाले होते,’ अशी व्यथा धारावीच्या कुंभारवाडय़ातील पुनिबेन वाला यांनी व्यक्त केली.