शिंदे गटाचे आमदार मंत्रीपदाची आस लावून अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराचा दावा करत होते. मात्र, त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी घेतला. या बंडानंतर पहिल्यांदाच मंगळवारी (४ जुलै) शिंदे-फडणवीस-पवार सरकारची मंत्रीमंडळ बैठक झाली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने ८ महत्त्वाचे निर्णय घेतले.

१. ऊर्जा विभाग

राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले. यानंतर असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

२. नियोजन विभाग

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाता यावं म्हणून सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजनेची घोषणा करण्यात आली. यामुळे ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.

३. जलसंपदा विभाग

दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता देण्यात आली.

४. उद्योग विभाग

नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

५. विधि व न्याय विभाग

सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

६. महसूल विभाग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय घेण्यात आला.

७. कृषि विभाग)

नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

८. पदुम विभाग

मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे करण्यात आला.

व्हिडीओ पाहा :

मंत्रीमंडळ बैठकीत राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका ‘पहिले वर्ष सुराज्याचे’ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ या मासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

हेही वाचा : Maharashtra Political News Live : मोठी बातमी! ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात, राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर केली ‘ही’ मागणी, वाचा प्रत्येक अपडेट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मंत्रालयात गेल्यावर अजित पवारांनी ट्वीट करत म्हटलं, “आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.”