scorecardresearch

पासचे दर कमी करणे अशक्य ; रेल्वे मंडळ अध्यक्षांचे स्पष्टीकरण

दर कमी करणे किंवा सवलती दिल्यास आपली अवस्था अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या श्रीलंकेसारखी होईल, असे उदाहरण त्यांनी दिले.

ac-local

मुंबई : वातानुकूलित लोकल आणि प्रथम श्रेणीचे तिकीट दर कमी केल्यानंतर पास दर कमी करण्याचीही मागणी होत असतानाच, यामध्ये कपात होणे मात्र अशक्य असल्याचे रेल्वे बोर्ड अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. त्रिपाठी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी खर्च करण्याची किंवा ते भरण्याची क्षमता आपण वाढवली पाहिजे. दर कमी करणे किंवा सवलती दिल्यास आपली अवस्था अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या श्रीलंकेसारखी होईल, असे उदाहरण त्यांनी दिले. महत्त्वाची बाब म्हणजे मेल, एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली सवलतदेखील पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही स्पष्ट केले. त्रिपाठी हे मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी मध्य व पश्चिम रेल्वेवरील विविध प्रकल्प व कामांचा आढावा घेतला.

मेल, एक्स्प्रेस गाडय़ांमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींबद्दल विचारले असता, अशा किती सवलती द्यायचा हा विचार केला पाहिजे. ही सवलत सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांना मूळ भाडय़ाच्या तिकिटावर ५० टक्के सवलत दिली जात होती. मार्च २०२० पासून करोनाची लाट सुरू होताच रेल्वे प्रवासावर निर्बंध आले. रेल्वे गाडय़ांना गर्दी होऊ नये यासाठी करोनात ज्येष्ठ नागरिकांची सवलत तात्पुरती बंद करण्यात आली. मात्र वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलत सुरूच ठेवली. अशा अकरा सवलती सुरूच आहेत. करोनामध्ये बंद असलेली मेल, एक्सप्रेसमधील अनारक्षित तिकीट सेवाही नुकतीच सुरू केली. तर यात पास प्रवासाचीही मुभा दिली.

एमयूटीपी प्रकल्पांच्या निधीबाबतही स्पष्टता नाही

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी प्रकल्पांना राज्य सरकारकडून गेल्या तीन वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळालेला नाही. तर रेल्वे बोर्डाने आधीच ७०० कोटी रुपये अतिरिक्त निधी दिला असून आणखी निधी देण्यासही नकार दिला आहे. या संदर्भातही रेल्वे बोर्ड अध्यक्ष व्ही. के. त्रिपाठी यांना विचारले असता, राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आयआरसीटीसीची सुविधा बंद

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार, डहाणूपर्यंत आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते खोपोली, कसारा, पनवेल आणि लोणावळा, खंडाळा विभागातील स्थानकांत आयआरसीटीने वॉटर वेंिडग यंत्रे बसवली. ३०० मिलिलिटर पाणी प्रवाशांच्या बाटलीमध्ये हवे असल्यास त्यासाठी एक रुपया आणि रेल्वेकडील बाटली किंवा ग्लासमध्ये हवे असल्यास दोन रुपये मोजावे लागत होते. सामान्य माणसाने या सुविधेला पसंतीही दिली. मात्र करोनाकाळात बंद ठेवलेली वॉटर वेंडिंग सेवा ही आजपर्यंत पुन्हा सुरूच केली नाही. आयआरसीटीसीची ही सुविधा यापुढे मिळणार नसल्याचेही सांगितले. मध्य आणि पश्चिम रेल्वेने मात्र स्थानकांवर अशी सुविधा स्वतंत्रपणे देणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईतूनही वंदे भारत रेल्वे गाडी..

रेल्वे मंत्रालयाकडून कमी खर्चात व आधुनिक अशी तयार केल्या जाणाऱ्या वंदे भारत रेल्वे गाडय़ांच्या उत्पादनावर रशिया, युक्रेन युद्धाचा कुठलाही परिणाम झालेला नाही. सप्टेंबर महिन्यापासून या रेल्वेंची निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होणार असून सुरुवातीला चार रेल्वे तर नंतर आठ रेल्वेंची निर्मिती केली जाईल. दीड ते दोन वर्षांत ७५ गाडय़ा तयार होतील. मुंबईतूनही वंदे भारत चालवण्याचे नियोजन आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Impossible to reduce pass rate of ac and first class in local train railway board president zws