मुंबई : अंधेरी येथील मरोशी ते सहारदरम्यान जुनी जलवाहिनी बदलण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने या कामाला वेग दिला असून या कामात अडथळा ठरणाऱ्या एकूण ९६ झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. दरम्यान, यापैकी ५५ झाडांचे भांडुप संकुलातील मोकळ्या जागेत पुनर्रोपण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून उर्वरित झाडे कापण्यात येणार आहेत.

महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी जुन्या जलवाहिन्या बदलून त्यांच्या जागी नवीन जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. पालिकेच्या के पूर्व विभागातील मरोशी ते सहारदरम्यानच्या जुन्या मुख्य जलवाहिनीच्या जागी नवी जलवाहिनी जोडण्यात येत आहे. या जलवाहिनीच्या कामाला जुलै २०२३ मध्येच सुरुवात करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे काम रखडले होते. मात्र, आता कामातील अडथळे दूर झाल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने पुन्हा जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून कामाला वेगही देण्यात आला आहे. ३ किमीच्या परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, या कामात संबंधित परिसरातील झाडे अडथळा बनली आहेत. त्यामुळे ही झाडे कापण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत वृक्ष प्राधिकरणानेही परवानगी दिली असून टप्प्याटप्प्याने ही झाडे कापण्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या जलवाहिनीचे काम पूर्ण होण्यासाठी साधारण एक ते दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. झाडे तोडण्यासंदर्भातील परवानगीच्या निर्णयाचा वृक्ष प्राधिकरणाने फेरविचार करावा. तसेच, जलवाहिनी बदलण्याच्या कामात अडथळा ठरणारी झाडे कापण्याऐवजी अन्य पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार करावा. तसेच, या निर्णयाबाबत स्थानिक नागरिकांशी चर्चा करावी. त्यांच्या सूचना मागवाव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.