मुंबई : इमारतीच्या गच्चीवरून छायाचित्र काढताना तोल जाऊन पडल्याने १६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. दहिसर येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली. जान्हवी चावला असे या मुलीचे नाव आहे.
दहीसर पूर्व येथील मिस्किटा नगरमधील परिचय इमारतीच्या सातव्या मजल्यावर जान्हवी राहत होती. नुकतीच तिने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा दिली होती. रविवारी सायंकाळी पावसाळी वातावरण तयार झाल्याने ती इमारतीच्या गच्चीवर आकाशातील छटांची छायाचित्रे काढण्यासाठी गेली होती. सायंकाळी ७ च्या सुमारास छायाचित्रे काढत असताना अचानक तिचा तोल जाऊन ती गच्चीवरून खाली पडली. तिला उपचारासाठी दहिसरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा जानवीचे वडील इमारतीच्या खाली बसले होते. दहिसर पोलिसांनी तिच्या पालकांचा जबाब नोंदवला आहे.
जान्हवी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकत होती. नुकतीच तिने दहावीची परीक्षा दिली होती. ती चावला दाम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. या घटनेत कसलाही संशयास्पद प्रकार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.