मुंबई : बेस्ट बसच्या वाहकाला एका प्रवाशाने बेदम मारहाण केल्याची घटना गिरगावमध्ये घडली. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग (एल.टी. मार्ग) पोलिसांनी २९ वर्षीय तरुण प्रवाशाला अटक केली.
फिर्यादी केशव रघुनाथ लोखंडे (४१) गिरगाव येथील अंबिका निवासमध्ये राहतात. ते बेस्टमध्ये बस वाहक (कंडक्टर) म्हणून कार्यरत आहेत. ते नेहमाप्रमाणे रविवारी कर्तव्यावर होते. रविवारी दुपारी ते गिरगाव-ठाकुरद्वार रोडवरील फणसवाडी परिसरितून जाणाऱ्या बसमध्ये (एमएच ०१- डीआर ३९२७) कार्यरत होते. त्यावेळी एक तरुण बसमध्ये चढला. बस दुपारी १.३० च्या सुमारास विनय हॉटेलजवळून जात असताना तरुणाने क्षुल्लक कारणावरून बस वाहक लोखंडे यांच्याशी वाद घातला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कर्तव्यावर असलेले सरकारी कर्मचारी लोखंडे यांना कामापासून अडवले. त्याच्याशी वाद घातला आणि त्यांचा खाकी गणवेष फाडला. त्यानंतर आरोपीने बसवाहकाला शिवीगाळ करून मारहाण केली.
याप्रकरणी बसवाहक लोखंडे यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१ (१), १३२, ११५ (२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात खार येथे बसचालक प्रकाश दुतोंडे (५३) यांचा एका वाहन चालकाशी वाद झाला. वाहनचालकाने बसमध्ये शिरून दुतोंडे यांना मारहाण केली होती.
बसचालक, वाहकांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटना
बस वाहक आणि बस चालकांना मारहाण करणे, शिवीगाळ किंवा धमकी देण्याच्या घटना वाढत आहेत. बस उशिरा आली, सुट्टे पैसे, दरवाजा उघडला नाही, बस पुढे नेली नाही इत्यादी क्षुल्लक कारणांवरून प्रवासी बस वाहकांबरोबर वाद घालतात. वाहतूक कोंडी, ताण, उकाडा, आणि शहरातील गर्दीमुळे नागरिक चिडतात. त्याचा राग मग क्षु्ल्लक गोष्टींवर बस चालक, बस वाहकांवर निघतो. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संघटनांनुसार, दर महिन्याला बसवाहक, बसचालकांवर हल्ले किंवा वादाच्या ४ ते ५ घटना मुंबईत नोंदवल्या जातात.२०२४–२५ या आर्थिक वर्षात बस वाहक आणि बस चालकांवर हल्ले आणि शिविगाळ कऱण्याची सुमारे ६० ते ७० प्रकरणे नोंदवली गेली. काहींमध्ये शारीरिक हल्ला, तर काहींमध्ये शिवीगाळ किंवा धमकी आदींचा समावेश होता.
