मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या ‘ओपन टू ऑल विशेष फेरी’ अंतर्गत प्रवेशाची संधी मिळालेल्या ८५ हजार १०१ विद्यार्थ्यांपैकी ७८ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे राज्यभरामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ लाख ७८ हजार ४४ इतकी झाली आहे, मात्र नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९३ हजार ७०३ विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता अखेरची प्रवेश फेरी २६ ते ३० ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे. अंतिम फेरीचे वेळापत्रक https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार फेऱ्या त्यानंतर ‘ओपन टू ऑल फेरी’ अंतर्गत दोन फेऱ्या राबविण्यात आल्या. अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या १४ लाख ७१ हजार ७४७ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ७८ हजार ४४ विद्यार्थ्यांनी या फेऱ्यांमधून प्रवेश घेतले आहेत. यामध्ये मुंबई विभागातून सर्वाधिक २ लाख ८५ हजार ४०० विद्यार्थांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल पुणे विभागातून २ लाख २५ हजार ४६१, छत्रपती संभाजी नगर विभागातून १ लाख ५८ हजार १८९, नाशिक विभागातून १ लाख ४२ हजार ६८८, नागपूर विभागातून १ लाख ३२ हजार २४१, कोल्हापूर विभागातून १ लाख २९ हजार ४८६, अमरावती विभागातून १ लाख २४ हजार ७६७ आणि लातूर विभागातून ७९ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ‘ओपन टू ऑल फेरी’च्या विशेष फेरीमध्ये ७८ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये ७४ हजार ४४० विद्यार्थ्यांनी नियमित फेरीद्वारे तर ४ हजार २१७ विद्यार्थ्यांनी कोट्याद्वारे प्रवेश निश्चित केले.
मुंबई शहरामध्ये सर्वाधिक प्रवेश
मुंबई विभागातून झालेल्या एकूण २ लाख ८५ हजार ४०० विद्यार्थांच्या प्रवेशापैकी मुंबई शहर व उपनगरातून १ लाख २७ हजार ५३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यातून ९३ हजार ७१२, पालघर जिल्ह्यामधून ३४ हजार ९४८ आणि रायगड जिल्ह्यातून २९ हजार २०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. ओपन टू ऑल अंतर्गत विशेष फेरीमध्ये मुंबई विभागातून सर्वाधिक २४ हजार २४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना अखेरची संधी
ओपन टू ऑल विशेष फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागा २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत. त्यानंतर २६ आणि २७ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी तसेच प्राधान्यक्रम यादीत बदल करता येणार आहे. २९ ऑगस्ट रोजी अंतिम विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यामध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना २९ आणि ३० ऑगस्ट दरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.