मुंबई : बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कांदा ८० रुपये किलोवर तर लसूण ४०० रुपये किलोवर गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा आणि लसणाची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. पुढील महिनाभर कांद्याचे आणि तीन – चार महिने लसणाचे वाढ चढेच राहणार आहेत.

दिवाळीनिमित्त नाशिक परिसरात कांद्याची खरेदी – विक्री आठवडाभर बंद होती. त्यामुळे बाजारांत काद्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा जवळपास संपला आहे. किरकोळ प्रमाणात दोन ते पाच टक्के उन्हाळी कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. खरीप कांद्याची काढणी सुरू असतानाच जोरदार पाऊस झाल्यामुळे कांदा सडला आहे. त्यामुळे खरीप कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. खरीप कांद्याची नुकतीच आवक सुरू झाली आहे. बाजारात कांद्याचा तुटवडा असतानाच बांगलादेशाने कांद्यावर लागू केलेला ५० टक्के आयात शुल्क १५ जानेवारीपर्यंत शून्य टक्के केला आहे. त्यामुळे बांगलादेशाला अचानक निर्यात वाढली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून पुणे, मुंबईसह राजधानी दिल्लीत दर्जेदार कांद्याचे दर ८० रुपयांवर गेले आहेत. खरीप हंगामातील नुकताच काढलेला, पाण्याचे प्रमाण जास्त असलेला कांदा ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मुंबईत किरकोळ बाजारात कांदा ६० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

हेही वाचा :मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

खरीप कांद्याची काढणी सुरू झाली आहे. कांदा हळूहळू बाजारात येऊ लागला आहे. दिवाळीनंतर अद्यापही कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी – विक्री सुरळित झालेली नाही. त्यामुळे पुढील महिनाभर कांद्याच्या दरात तेजी राहणार आहे. खरिपातील कांद्याची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात काहीसा दिलासा मिळू शकेल, अशी माहिती विंचूर येथील कांद्याचे व्यापारी अतिष बोराटे यांनी दिली.

तीन महिने लसूण तेजीत राहणार

किरकोळ बाजारात लसणाचे दर ४०० ते ४५० रुपये किलोंवर गेले आहेत. लसणाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. लसणाची रब्बी हंगामात लागवड केली जाते. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात लसणाचे उत्पादन होते. रब्बी हंगामातील लसणाची लागवड आता सुरू झाली आहे. या लसणाची काढणी फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यामुळे पुढील तीन – चार महिने लसणाचे दर तेजीत राहणार आहेत.

हेही वाचा :ठाकरे बंधू खेळामध्ये रमले; प्रचारादरम्यान तरुणाईमध्ये मिसळले, क्रिकेट आणि फुटबॉल खेळत क्षणभर विरंगुळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याबाहेरून येणारी आवक घटली

बाजारात कांदा आणि लसणाचा तुटवडा आहे. शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांदा आणि लसूण संपला आहे. खरीप हंगामातील कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील महिनाभर कांद्याचे दर तेजीत राहतील. राज्याबाहेरून होणारी लसणाची आवक थंडावली आहे. रब्बी हंगामातील नवीन लसूण बाजारात येईपर्यंत लसणाचे दर आवाक्यात येणार नाहीत, अशी माहिती पुणे बाजार समितीतील अडते असोशिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.