मुंबई : समलैंगिक संबंधाची अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन ३२ वर्षीय सनदी लेखापालाकडून दोघांनी तब्बल ३ कोटी रुपये खंडणी उकळली. या दोघांच्या त्रासाला कंटाळून अखेर सनदी लेखापालाने विष प्राशन करून आत्महत्या केली. वाकोला पोलिसांनी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सनदी लेखापाल राज मोरे (३२) सांताक्रूझ येथे आईसोबत रहात होता. तो शीव येथील एका कंपनीत कामाला होता. राज मोरे याची इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर राहुल पारवानी याच्यासोबत सप्टेंबर २०२४ मध्ये ओळख झाली. ते दोघे नियमित भेटत होते आणि दोघांचे शारिरीक संबंध होते. मात्र राहुलची सहकारी सबा कुरेशी याने या संबंधाची अश्लील चित्रफित तयार केली. या चित्रफितीच्या आधारे राहुल आणि सबा हे दोघे राज मोरे याला ब्लॅकमेल करीत होते.
मागील १८ महिन्यांच्या काळात या दोघांनी राज मोरे याच्याकडून अडीच कोटी रुपये घेतले. तसेच त्याची महागडी गाडीही काढून घेतली होती. त्यामुळे तो नैराश्यात होता. अखेर या दोघांच्या त्रासाला कंटाळून रविवारी संध्याकाळी राजने सांताक्रूझ येथील राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या तीन चिठ्ठ्यांमधून या प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकऱणी वाकोला पोलिसांनी राहुल पारवानी आणि सबा कुरेशी या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी उकळणे आदींसाठी कलम १०८, ३०८(२), ३०८ (९३), तसेच ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.