Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू या धडकेत झाला. या दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सोशल मीडियासह राज्यभरात उमटले. ज्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या मुलाची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र त्याला अटक केली असताना पिझ्झा बर्गर कुणी दिला? असा सवाल आता संजय राऊत यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळेंनीही विचारला आहे.
अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात
सोशल मीडियासह पुणे आणि राज्यभरातून पोर्श अपघात प्रकरणावर जेव्हा संतप्त पडसाद उमटले त्यानंतर दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलाचे वडील पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.
हे पण वाचा- Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
“दोन निष्पाप जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलामुळे अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांच्या पालकांची अवस्था पाहिलीत का? याची जबाबदारी कोण घेणार? रस्ते सुरक्षेबाबत सरकार काही बोलणार की नाही? माझा आरोप आहे की हा मोठा गुन्हा आहे. ज्याने केला असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मात्र देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत असं म्हणाले की पोलिसांनी राजकीय दबावाखाली दबलं जाऊ नये. राजकीय दबाव कुणी टाकला? याचं उत्तर मिळालं पाहिजे. राजकीय दबाव टाकला गेला हे सरकारनेच मान्य केलं आहे. त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे.” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
त्या मुलाला पिझ्झा बर्गर कुणी दिला?
“अल्पवयीन मुलाला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याला पिझ्झा-बर्गर कुणी दिला? तसंच माझा हा प्रश्नही आहे की १७ वर्षांच्या मुलाला दारु कशी काय दिली? गाडीची चावी देताच कशी काय? एक युवक आणि युवती या दोघांचा मृत्यू झाला आहे. ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याचा मी निषेध करते. कुणी फोन केल्यावर त्या मुलाला जामीन मिळाला याचं उत्तर देशाला मिळालं पाहिजे. या सगळ्या प्रकरणात सरकारचा हलगर्जीपणा सपशेलपणे दिसून येतो आहे. या सगळ्यावर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून उत्तर दिलं पाहिजे.” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.