मुंबई : गोरेगाव पूर्व येथून पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरून २० फूट खाली मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील दोघेही जखमी अवस्थेत उड्डाणपुलाखाली सापडले. त्यांना तातडीने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. दोघांपैकी मोटरसायकल कोण चालवत होता, ते अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.

गोरेगाव पूर्व येथून पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरील मार्गिकेवर सोमवारी हा अपघात झाला. वैभव गमरे (२८) आणि त्याचा मित्र आनंद इंगळे पहाटे साडे चारच्या सुमारास मोटारसायकलने या उड्डाणपुलावरून जात होते. ही मोटारसायकल खासगी कंपनीत काम करणाऱ्या गमरेची आहे. गमरे गोरेगाव पश्चिम येथील तीन डोंगरी येथे पत्नीसोबत वास्तव्यास होता. इंगळे गोरेगाव पूर्व येथे वास्तव्यास होता. तो अविवाहित असून त्याचे कुटुंबिय गावी असतात.

हेही वाचा : मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची चाचणी अनिवार्य;आयआयटी मुंबई आणि शासकीय प्रयोगशाळेत नमुन्यांची सामर्थ्य चाचणी होणार

पहाटे साडेचारच्या सुमारास अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार गोरेगाव मोबाइल क्रमांक १ वर कार्यरत पोलिसांना गोरेगाव पश्चिम येथील एमडीएनएल जंक्शन येथे दोन तरूण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे कळवण्यात आले. त्यानुसार गोरेगाव पोलीस मोबाइल व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी इंगळे व गमरे बेशुद्धावस्थेत होते. रुग्णवाहिका बोलावून तात्काळ त्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पहाटे साडेपाचच्या सुमासार त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा : परेल येथे झाड पडून महिला ठार; दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओळखपत्रावरून गमरेचा पत्ता व पत्नीचा मोबाइल क्रमांक पोलिसांना मिळाला. त्यांनी तिला अपघाताबाबत माहिती देऊन रुग्णालयात येण्यास सांगितले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दोघेही दुचाकीवरून कोठे गेले होते, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच दुचाकी कोणी चालवत होते तेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिणामी, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.