मुंबई : शीव कोळीवाडा येथील सरदार नगरमधील एका घरामध्ये दागिन्यांची चोरी करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफिने अटक केली. या चोराने चोरलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर घरफोडीचे २० गुन्हे दाखल असून, न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शीव येथील सरदार नगरमधील एका घरातील सर्वजण २१ ते २४ मार्च या कालावधीत बाहेरगावी गेले होते. घरात कोणीही नसल्याचे पाहून चोराने स्वयंपाक घराच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून आत प्रवेश केला. घरातील सोने – चांदीचे दागिने घेऊन चोर पसार झाला. घरातील व्यक्ती परत आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान संबंधित आरोपीचे नाव निखिल कांबळे (२९) असल्याचे समजले. निखिल बेरोजगार आहे. तसेच, चेंबूर येथील आर. सी. एफ. एच. पी कॉलनीत तो वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. याची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र, त्या ठिकाणी आरोपी सापडला नाही. आरोपी सराईत चोर असल्यामुळे आसपासच्या वाशीनाका, चेंबूर, चुनाभट्टी, नेहरूनगर, कुर्ला, गोवंडी आदी भागांमध्ये त्याचा शोध घेण्यात आला.

दरम्यान, मानखुर्द येथील साठे नगर परिसरात दररोज सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान आरोपी येत असल्याचे पोलिसांना सूत्रांकडून समजले. त्यांनतर पोलिसांनी २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सापळा रचला. दुपारी साधारण २ वाजता आरोपी परिसरात येताच त्याला मोठ्या शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात आरोपीने शीव आणि व्ही. बी. नगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच, गुन्ह्यात चोरी झालेला १०० टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. त्याला पोलिसांनी न्यायालायात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीने यापूर्वी २० घरांमध्ये चोरी केली आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात ५, नेहरू पोलीस ठाण्यात ७, कुर्ला पोलीस ठाण्यात २, दादर पोलीस ठाण्यात १, कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात १, तसेच गोवंडी, चुनाभट्टी, शीव, व्ही. बी नगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ गुन्हा आरोपीविरोधात दाखल आहे.