मुंबई: भरधाव वेगात असलेल्या एका मोटारगाडीने सहा ते सात वाहनांना जबर धडक दिल्याची घटना रविवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. या घटनेनंतर मुलुंड पोलिसांनी पाठलाग करून मोटारगाडी चालकाला अटक केली असून पोलीस त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.
मुलुंडच्या वैशाली नगर परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. तेथे करण मोहिते (२६) हा भरधाव वेगात मोटारगाडी घेऊन आला. मोटारगाडी वेगात असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही मोटारगाडी एका लोखंडी खांबावर जाऊन आदळली. घटनास्थळाजवळच मुलुंड पोलीस ठाण्याची बीट चौकी आहे. मोठ्या आवाजानंतर तेथे असलेले पोलीस कर्मचारी तत्काळ बाहेर आले. त्यांनी मोटारगाडी चालकाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र पोलिसांना पाहून तो अधिक वेगात पुढे गेला.
पोलिसांना मोटारगाडी चालकावर संशय आल्याने त्यांनी तत्काळ त्याचा पाठलाग केला. मात्र घाबरलेल्या चालकाने आणखी काही वाहनांना धडक देत, पूर्व द्रुतगती मार्ग गाठला. अखेर विक्रोळी परिसरात पोलिसांनी चालकाला पकडून ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याची तपासणी केली असता, तो नशेत नसल्याचे समोर आले आहे. तपासात त्याने सहा ते सात वाहनांना धडक दिली आहे. मात्र नुकसान झालेल्या वाहन चालकांनी पोलीस ठाण्यात आद्यपही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र अपघातग्रस्त वाहनांची संख्या वाढण्याची देखील शक्यता असून पोलीस त्याबाबत अधिक तपास करत आहेत.