मुंबई : मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असताना, रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी सकाळपासून सीएसएमटीवरून ठाणे, बदलापूर, कल्याण दिशेला जाणाऱ्या वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्या वेळेत सामान्य लोकल चालवण्यात आल्या. त्यामुळे वातानुकूलित तिकीट आणि पासधारकांना नाईलाजाने सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागला.
सामान्य लोकलमधील गर्दीचा प्रवास, धक्काबुक्की, आसनावर बसण्यावरून होणारे वाद, यातून सुटका मिळण्यासाठी हजारो प्रवासी वातानुकूलित लोकलचा पास आणि तिकीट काढतात. वातानुकूलित लोकलचा प्रवास सामान्य लोकलच्या तुलनेत कमी गर्दीचा, आरामदायी आणि सुरक्षित होतो. यासाठी प्रवासी तिकिटासाठी अधिक रक्कम मोजतात. परंतु, मध्य रेल्वेने मंगळवारी १२ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द केल्या. त्या ऐवजी सामान्य लोकल धावल्या. त्यामुळे खिशात वातानुकूलित लोकलचा पास असूनही प्रवाशांना सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागला.
मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी, गर्दीमुक्त व्हावा यासाठी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात वातानुकूलित लोकलचे ७ रेक असून दररोज ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. परंतु, मध्य रेल्वेने मंगळवारी अप आणि डाऊन मार्गावरील एकूण १२ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करून त्याऐवजी सामान्य लोकल चालवण्यात येते. गर्दीपासून मुक्तता आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवासी वातानुकूलित लोकलचे तिकीट घेतात. परंतु, रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांना सामान्य लोकलने प्रवास करावा लागतो. आठवड्यात कामकाजाच्या दिवसांत वातानुकूलित लोकल वेळापत्रकाप्रमाणे चालवता येणे शक्य नाही का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.