मुंबई : मंत्रालयात प्रवेशासाठीची सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्यात येणार असून अभ्यागतांच्या प्रवेशावर कठोर निर्बंध येणार आहेत. अभ्यागतांना ज्या खात्यामध्ये काम आहे, त्याच मजल्यावर प्रवेश मिळणार असून अन्य मजल्यांवर जाता येणार नाही.

मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेतील बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. मंत्रालयात येणारे नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुलभपणे प्रवेश मिळावा आणि सुरक्षा भक्कम राहावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात यावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांकडून ई-कॅबिनेटचे सूतोवाच

महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रालयाच्या सुरक्षेचा नव्याने आढावा घेतला जात असून फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. त्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते. राज्यभरातून कामे घेऊन नागरिक मंत्रालयात येतात आणि खूप गर्दी होते. या वाढत्या गर्दीचा सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडतो. त्यामुळे अभ्यागतांसह कर्मचाऱ्यांचा प्रवेश सुलभ होऊन सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येणार आहे.

अत्याधुनिक यंत्रणा

मंत्रालयात प्रवेश करण्यासाठीचा पास देताना अभ्यागताचे छायाचित्र काढले जाते. आता इमारतीच्या प्रवेशद्वारातही सुरक्षा अडथळे लावण्यात आले असून प्रत्येक व्यक्ती कॅमेरामध्ये दिसेल आणि त्याची ओळख, छायाचित्र व नाव बाजूला असलेल्या मॉनिटरवर येईल व ओळख पटल्यावरच त्याला प्रवेश खुला होईल अशी व्यवस्था प्रत्येक मजल्यावर उभारण्यात येणार असून ज्या मजल्यावर नागरिकांचे काम आहे, त्याला त्या खात्यासाठीच पास दिला जाईल व अन्य मजल्यांवर जाता येणार नाही, अशी यंत्रणा उभारण्यात येत आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : मुंबै बँकेवर सरकार मेहरबान, सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन खाती उघडण्यास मान्यता

मुख्यमंत्र्यांच्या सूचना

● नागरिकांच्या मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडण्याची व्यवस्था यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा.

● मंत्रालयातून विधान भवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी ये-जा करतात. अधिवेशन काळात ही वर्दळ वाढते. या सर्व ठिकाणी कर्मचाऱ्यांना सुरक्षा पास द्यावेत.

● मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्गाचे काम सुरू असून कर्मचाऱ्यांना तेथून प्रवेशाची सोय उपलब्ध करावी.

● मंत्रालयातून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे काही प्रकार झाल्यावर काही वर्षांपूर्वी दुसऱ्या मजल्यावर दोरखंडाची जाळी लावण्यात आली. तरीही त्यात उड्या मारण्याचे प्रसंग घडल्याने सहाव्या मजल्यासह काही मजल्यांवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू झाले. हे काम तातडीने पूर्ण करावे. हे काम झाल्यावर दोरखंडाची जाळी काढून टाकण्यात यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● मंत्रालय प्रवेशद्वारावर सामानाची चोख तपासणी करण्यात यावी. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू मंत्रालयात येणार नाही, याची दक्षता घ्यावी.