मुंबई : अद्यायावत तंत्रज्ञान आणि दर्जेदार सुविधांमुळे रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल, असा दावा करत नायर दंत रुग्णालयाच्या नव्या विस्तारित इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र, जुन्या इमारतीत बाह्यरुग्ण विभाग असल्याने रुग्णांना उपचारासाठी किमान तीन ते चारदा दोन्ही इमारतींत हेलपाटे मारावे लागत आहेत. ही पायपीट रुग्णांसाठी त्रासदायक ठरत आहे. नायर दंत महाविद्यालयात अद्यायावत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी नवी विस्तारित इमारत उभारण्यात आली. त्यात रुग्ण नोंदणी विभागासह अनेक महत्त्वाचे विभाग स्थलांतरित करण्यात आले. मात्र, बाह्यरुग्ण विभाग जुन्या इमारतीतच ठेवण्यातआला. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनी नोंदणी केल्यानंतर दंत तपासणीसाठी जुन्या इमारतीमधील बाह्यरुग्ण विभागात पाठवण्यात येते. हेही वाचा : मुंबईतील प्राणीप्रेमी महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला बिहारमधून अटक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ‘क्ष किरण’ वा दातांशी निगडीत अन्य चाचण्या करण्यासाठी त्यांना पुन्हा नवीन इमारतीत जावे लागते. त्यानंतर चाचण्यांचे अहवाल घेऊन त्यांना पुन्हा जुन्या इमारतीतील डॉक्टरांकडे यावे लागते. चाचण्यांचा अहवाल व्यवस्थित न आल्यास रुग्णांना पुन्हा नव्या इमारतीत पाठवण्यात येत आहे. अशा पद्धतीने एका रुग्णाला किमान तीन ते चार वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रत्येक विभाग वेगवेगळ्या मजल्यावर आहेत. त्यामुळे रुग्णांना चाचण्या वा उपचारांसाठी संबंधित मजल्यांवरील विभागात जावे लागते. रुग्णालय व्यवस्थापनाच्या या ‘द्राविडी प्राणायामा’मुळे रुग्ण हैराण झाले आहेत. हेही वाचा :Mumbai Rains Update : मुंबईसह आसपासच्या परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस, बेस्ट आणि लोकल वाहतूक मंदावली ‘उपचार नको, पण फेऱ्या आवरा’ पत्नीला नायर दंत रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आलेल्या हसन इब्राहिम खान यांनी रुग्ण नोंदणी केल्यानंतर किमान तीन वेळा नव्या इमारतीमधून जुन्या इमारतीत फेऱ्या मारल्याचे सांगितले. नव्या-जुन्या इमारतींमध्ये फेऱ्या मारल्यानंतर रुग्ण थकून जातो. पूर्वी बाह्यरुग्ण विभाग व अन्य महत्त्वाचे विभाग जुन्या इमारतीत होते. त्यामुळे फारसा त्रास होत नव्हता. मात्र, काही विभाग नव्या इमारतीत, तर काही विभाग जुन्या इमारतीत ठेवल्यामुळे रुग्णांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. पत्नीचा दात प्रचंड दुखत असल्याने तिला या फेऱ्यांमुळे अधिकच त्रास होऊ लागल्याचे हसन यांनी सांगितले.