मुंबई : पश्चिम रेल्वेचा लेटलतीफ कारभार दिवसागणिक वाढू लागला आहे. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब होत आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास माहीम येथे तांत्रिक बिघाड झाल्याने, पश्चिम रेल्वे काही काळ विस्कळीत झाली.

माहीम येथे गुरुवारी सकाळी १०.४७ च्या सुमारास ट्रक पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने लोकल खोळंबल्या. लोकल एका मागे एक उभ्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेच्या संबंधित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या तांत्रिक बिघाडामुळे लोकल पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या. परंतु, माहीम स्थानकाजवळ एक लोकल अडकल्याने त्यातील प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दुरुस्तीचे काम सकाळी ११.०५ वाजता पूर्ण करण्यात आले. परंतु, सुमारे १८ मिनिटांच्या कालावधीमुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे अनेक लोकल कूर्मगतीने धावत असल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून वांद्रे – चर्चगेट दरम्यान, लोकल अत्यंत धीम्यागतीने धावत आहेत.