मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने १४९ दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात केली. इच्छुकांना २५ ऑगस्टपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज करता येणार असून २९ ऑगस्ट रोजी ई लिलावाचा निकाल जाहीर होणार आहे. या ई लिलावात मुंबईतील १७ ठिकाणच्या १४९ दुकानांचा समावेश असून मागील ई लिलावात विकल्या न गेलेल्या १२४ दुकानांचा त्यात समावेश आहे. मुंबई मंडळाने या दुकानांसाठी २३ लाख रुपयांपासून थेट १२ कोटी रुपयांपर्यंतची बोली निश्चित केली आहे. या बोलीपेक्षा सर्वाधिक बोली लावणारा अर्जदार विजेता ठरणार आहे. या ई लिलावातून मुंबई मंडळाला २२९ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.

म्हाडाच्या गृहप्रकल्पातील रहिवाशांच्या सोयीसाठी काही दुकाने बांधण्यात येतात. या दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने करण्यात येते. त्यानुसार मागील वर्षी मंडाळने १७३ दुकानांचा ई लिलाव केला. मात्र या ई लिलावात केवळ ४९ दुकाने विकली गेली आणि १२४ दुकाने रिक्त राहिली. त्यामुळे ही रिक्त १२४ दुकाने आणि नव्या २५ अशा एकूण १४९ दुकानांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेत मुंबई मंडळाने मंगळवारपासून (१२ ऑगस्ट) नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात केली आहे.

इच्छुकांना २५ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर संगणकीय पद्धतीने बोली लावण्यास २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ पासून सुरुवात होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता बोली लावण्याची मुदत संपुष्टात येईल. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ई लिलावाचा निकाल जाहीर होणार आहे. सर्वाधिक बोली लावणारा पात्र अर्जदार दुकानासाठी विजेता ठरणार असून पुढील कार्यवाही करून त्याला दुकानाचे वितरण करण्यात येणार आहे.

कुठे किती दुकाने आणि किती बोली

ठिकाण – दुकानांची संख्या – बोली रक्कम

गव्हाणपाडा – ६ दुकाने – ४३ लाख ५४ हजार ४०४ ते १ कोटी ९ लाख ०४६ रुपये

स्वदेशी मिल, कुर्ला – ५ दुकाने – ७४ लाख ५७ हजार ४८५ ते १ कोटी ९ लाख ०४६ रुपये

तुंगा पवई – २ दुकाने – ६६ लाख ९१ हजार ६७३ ते ७४ लाख ३५ हजार ८१३ रुपये

कोपरी पवई – १ दुकान – ७९ लाख ३१ हजार ०९५ रुपये

कोपरी पवई, इमारत क्रमांक १ – २२ दुकाने – २ कोटी २० लाख ४ हजार ६१८ ते ७ कोटी ११ लाख ४१ हजार ५२७रुपये

चारकोप, भूखंड क्र. १ – ९ दुकाने – ४३ लाख ५९ हजार ०१९ ते १ कोटी ६ लाख ४५ हजार ९४१ रुपये

चारकोप भूखंड क्र २ – ११ दुकाने – ४७ लाख २ हजार २६० ते ८५ लाख २६ हजार ९९६ रुपये

चारकोप भूखंड क्र.३ – ३ दुकाने – ३९ लाख २८ हजार ६४४ ते १ कोटी ४९ लाख १८ हजार ८२३ रुपये

जुने मागाठाणे – ६ दुकाने – ४९ लाख ९७ हजार ९२१ ते ७० लाख ५६ हजार ७२० रुपये

महावीर नगर, कांदिवली – ६ दुकाने-३५ लाख ९२ हजार ०९३ ते ४७ लाख २० हजार २६९ रुपये

प्रतीक्षानगर – ९ दुकाने – २३ लाख १४ हजार ०८९ ते ४१ लाख ३१ हजार ८९९ रुपये

ॲन्टाॅप हिल – ३ दुकाने – ३८लाख ५६ हजार ६७० ते ७५ लाख ९४ हजार ५७४ रुपये

मालवणी – ४६ दुकाने – ३६ लाख ७३ हजार ९०८ ते ४८ लाख ४९ हजार ०४२ रुपये

बिंबिसार नगर – १७ दुकाने – १कोटी ७१ लाख ३६ हजार १७६ ते १२ कोटी ६३ लाख ८० हजार २२७ रुपये

गोरेगाव, शास्त्रीनगर – १ दुकान – ७२ लाख ७८ हजार ५३७ रुपये

सिद्धार्थ नगर – १ दुकान – १ कोटी ५२ लाख ७३ हजार ५७० रुपये

मजासवाडी – १ दुकान – ९७ लाख ५५ हजार ९६४ रुपये

अनामत रक्कम किती

५० लाखापर्यंतच्या बोलीसाठी एक लाख रुपये

५० लाख ००१ रुपये ते ७५ लाखांपर्यंतच्या बोलीसाठी २ लाख रुपये

७५ लाख ००१ रुपये १ कोटीपर्यंतच्या बोलीसाठी ३ लाख रुपये

१ कोटींहून अधिकच्या बोलीसाठी ४ लाख रुपये