मुंबईः बकरी ईदच्या दिवशी सर्व मित्र परिसरात भेटले असताना एका मित्राने मोबाईल चोरल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून त्याच्या पोटात चाकू मारल्याची घटना वडाळा परिसरात घडली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरूणाला वडाळा टी.टी. पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावरही शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी झालेल्या हाणामारीत दुसरा आरोपीही जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
फैजान शेख, मोहम्मद हसनेन व आसिफ खान तिघेही चांगले मित्र असून अॅन्टॉपहिल परिसरात राहतात. बकरी ईद निमित्त तिघेही परिसरात भेटले होते. यावेळी आरोपी आसिफ खान याने त्याचा मोबाईल तेथील दुकानात चार्जिंगसाठी ठेवला होता. पण तो विसरला. त्यामुळे त्याला मोबाईल चोरी गेला, असे वाटले. त्याने याबाबत फैजान शेखवर मोबाईल चोरल्याचा संशय व्यक्त केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. सायंकाळी या वादानंतर दोघेही भेटले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. आसिफ खान व हसनेन या दोघांनी फैजान शेखवर हल्ला केला. यावेळी आसिफ खानने त्याच्याकडील मोबाईल फैजानच्या पोटात मारला. यावेळी झालेल्या वादात आसिफ खानच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. या घटनेनंतर फैजानला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पोटात गंभीर जखम आहे. दुसरीकडे आसिफच्या डोक्याताही गंभीर दुखापत झाली आहे. प्रकरणी आसिफ व हसनेन विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हसनेनला अटक केली आहे. आसिफ जखमी असल्यामुळे त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्याला याप्रकरणी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याला रुग्णालयातून सोडल्यानंंतर पोलीस त्याच्याविरोधात पुढील कारवाई करतील.
फैजानचा भाऊ मोहम्मद सुल्तान मोहम्मद हनिफ शेख याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५(२), ३(५), ३७(१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू अद्याप सापडलेला नसून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक आरोपी हसनेन हा डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो. यापूर्वी त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा नसल्याेच अधिकाऱ्याने सांगितले. आसिफला झालेल्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.