मुंबईः परदेशातून ३६१० मेट्रीट टन अक्रोडाची आयात करून सुमारे ४४ कोटी रुपये कर गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुजरातममधील २४ वर्षीय व्यावसायिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआयने) अटक केली. चिलीमधून या अक्रोडांची आयात करण्यात आली होती. याप्रकरणी डीआरआयचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
स्नेह दीपकभाई ककाडिया (२४) असे अटक आरोपीचे नाव असून तो गुजरातमधील सूरत शहरातील रहिवासी आहे. त्याचे एन्जल एन्टरप्राईजेस नावाने सूरतमध्येच नोंदणीकृत कार्यालय आहे.
आरोपी आयात करण्य़ात आलेल्या मालाची किंमत कमी दाखवून सीमाशुल्क बुडवत असल्याचे डीआरआयच्या तपासात निष्पन्न झाले. डीआरआयने अधिक तपास केला असता चिली येथील पुरवठादाराने आकारलेल्या रकमेपेक्षा ५० ते ७० टक्के रक्कम कमी दाखवून आरोपीने ३६१० मेट्रीक टन अक्रोड आयात केले. त्यात ४४ कोटी रुपये सीमाशुल्क बुडवण्यात आल्याचा आरोप आहे.
कागदोपत्री ही रक्कम कमी दाखवण्यात यायची. उर्वरित रक्कम रोख स्वरूपात चिली येथील पुरवठादाराला पाठवण्यात यायची. त्यासाठी हवाला रॅकेटचा वापर करण्यात येत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी डीआरआय अधिक तपास करीत आहे.
युएईमधून आयात झाल्याचा बनाव
आरोपी व्यावसायिक परदेशातून अक्रोड आयात करतात. अक्रोडांची आयात चिलीमधून करण्यात येते. पण कर बुडवण्यासाठी ते अक्रोड युनाटेड अरब अमिराती (यूएई) येथे पाठवण्यात येतात. चिलीमधील सर्व पावत्या तेथे बदलून अक्रोडची किंमत कमी दाखवली जाते. त्यानंतर यूएईमधील कंपनीच्या मदतीने कमी दराच्या नव्या पावत्या तयार केल्या जातात. त्यानंतर ते सर्व कंटेनर भारतात पाठवले जातात. त्यामुळे त्या वस्तूंवर कमी सीमाशुल्क आकारण्यात येत होता. परिणामी, केंद्र सरकारचे मोठे नुकसान झाले आहे.
यापूर्वी नवी मुंबईतील व्यावसायिकाला अटक
डीआरआने यापूर्वी अशाच प्रकारे कर चोरीप्रकरणी नवी मुंबईतील व्यावायिकाला अटक केली होती. त्याने परदेशातून ३६३० मेट्रीट टन अक्रोडांची आयात करून सुमारे ४२ कोटी रुपये कर गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यानेही चिलीमधून अक्रोडाची आयात केली होती. याप्रकरणी डीआरआयचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. आकाश अग्रवाल असे अटक आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील रहिवासी आहे. त्यानेही आयात रकमेपेक्षा ५० ते ७० टक्के दर कमी दाखवून कर चोरी केली होती. याप्रकरणीही डीआरआय अधिक तपास करीत आहे.