मुंबई : गुंतवणुकीवर दामदुप्पट नफा, तसेच मोफत आरोग्य विमा आदी आश्वासने देऊन एका कंपनीने अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली असून याप्रकरणी कंपनीच्या ११ संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तक्रारदार अशोक झगडे (६५) मालाड येथे राहतात. त्यांची सिक्युअर ॲग्रो हेल्थ केअर कंपनीतील काही संचालकांबरोबर ओळख होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल आणि ५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत मिळेल असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. त्यानुसार २०१९ मध्ये अशोक झगडे यांनी ५ लाख गुंतवले होते. त्यांच्या ओळखीच्या अन्य इसमांनीही या कंपनी ५ ते ७ वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक केली होती. मात्र कुणालाही नफा मिळत नव्हता, तसेच कुठलाही आरोग्य योजनेचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे गुंतवलेल्या पैसे परत मागण्यात आले. परंतु ते परत करण्यात आले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर झगडे यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार कंपनीच्या ११ संचालकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या १२० (ब), ३४, ४०६, ४२०, ४६७, ४७१, तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम ३ आणि ४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.