मुंबई : यंदा ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात जोगेश्वरी येथील कोकणनगर गोविंदा पथकाने १० थरांचा मानवी मनोरा रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या विश्वविक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. या विश्वविक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे वरिष्ठ अधिकारी स्वप्निल डांगरकर यांनी कोकणनगर गोविंदा पथकाला अधिकृत प्रमाणपत्र दिले.
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी कोकणनगर गोविंदा पथकाकडे १० थरांच्या विश्वविक्रमासाठीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी गोविंदांसह शिंदे गटाच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक उपस्थित होते. ‘कोकणनगर गोविंदा पथकाने तब्बल १० थरांचा मानवी मनोरा रचत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव कोरले. हा सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा जागतिक विजय आहे. या विक्रमामुळे महाराष्ट्राचे नाव जगभर दुमदुमले असून ही आपल्या संपूर्ण गोविंदांची ऐतिहासिक कामगिरी आहे’, असे मत पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केले.
जय जवान गोविंदा पथकाकडून नाराजी व्यक्त
यंदाच्या दहीहंडी उत्सवात शनिवार, १६ ऑगस्ट रोजी जोगेश्वरीतील कोकणनगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथकाने १० थरांचा मानवी मनोरा रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यापैकी कोकणनगर गोविंदा पथकाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे. मात्र एकाच दिवशी ३ वेळा १० थर रचूनही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली नसल्याने जय जवान गोविंदा पथकाने पत्रकार परिषद घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दहीहंडी उत्सव होऊन एक महिना झाल्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या विश्वविक्रमाची नोंद होत आहे.
हा विश्वविक्रम रचला गेला, त्या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधीही उपस्थित नव्हते. हे त्यांच्याच नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद होण्यासाठी निकष काय होते? हे समजले नाही. आम्हाला उत्तर दिले जात नाही. आम्हाला कोणत्याही गोविंदा पथकाला कमी लेखायचे नाही. परंतु एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय का? आम्हाला न्याय मिळायला हवा’, असे जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दहीहंडी उत्सवाच्या दिवशी सर्व गोविंदा पथक विविध ठिकाणच्या दहीहंडी महोत्सवामध्ये सहभागी होण्यात व्यग्र असतात. त्यामुळे एका ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करून गोविंदा पथकांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या स्पर्धेत उतरण्याचे आवाहन केले पाहिजे होते. तेव्हा आम्ही पूर्ण क्षमतेने स्पर्धेत उतरून आमचे कौशल्य दाखविले असते. एका पथकाला घाईघाईने मान्यता देऊ नये, जेव्हा दुसरे पथकही त्याच दिवशी, त्याच स्तरावर पोहोचले आहे. पुरावे, गुणवत्ता आणि न्यायाच्या आधारे निर्णय घ्यावा, असेही जय जवान गोविंदा पथकाकडून सांगण्यात आले.