मुंबई : गिरगाव चौपाटीवर रविवारी लालबागच्या राज्याचे विसर्जन प्रक्रियेत प्रचंड दिरंगाई झाली. विसर्जनातील घोळामुळे गणपतीचे विसर्जन चंद्र ग्रहणात करावे लागले. त्यामुळे लाखो भाविक संतप्त झाले आहेत. तसेच, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा छळ झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला आहे. तसेच, विसर्जनातील खोळंबा व भक्तांचा करण्यात आलेला छळ याप्रकरणी मंडळातील कार्यकारी समितीतील सदस्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.
लालबागच्या राजाच्या लांबलेल्या मिरवणुकीमुळे विसर्जनाला विलंब झाला. तब्बल ३३ तासांनंतर रविवारी रात्री ९.१० च्या सुमारास विसर्जन पार पडले. मात्र, त्यावेळी चंद्र ग्रहण लागले होते. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा दावा मच्छीमार संघटनेने केला आहे. वर्षानुवर्षे विसर्जन सोहळा हा मुंबईतला कोळी बांधव करत आलेला आहे. यावर्षी पहिल्यांदाच कोळी बांधवांना डावलून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विसर्जन घडवून आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.
विसर्जन चंद्र ग्रहणात करणे हा केवळ गणपतीचा अपमान नसून तो सर्व गणेशभक्तांचा अपमान असल्याची भावना अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे विसर्जन प्रक्रियेची चौकशी करून मंडळाच्या कार्यकारी मंडळातील व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
कोळी समाजातील मासे विक्रेत्या महिलांनी १९३४ साली लालबागच्या राजाची स्थापना केली. लालबागच्या राजाची लोकप्रियता वाढल्यानंतर संबंधित मंडळातील कार्यकारिणीतील सदस्यांनी उत्सवाचे बाजारीकरण सुरू केल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केला. ज्या सामान्य भाविकांमुळे या मंडळाला प्रसिद्धी आणि अफाट पैसा मिळू लागला, त्याच भाविकांची अवहेलना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. गणपती कोणाच्या मालकीचा नाही, अशीही खोचक टीका त्यांनी केली.
दरम्यान, लालबागच्या राज्याच्या दर्शन प्रक्रियेत तातडीने बदल करून व्हीआयपी संस्कृती बंद करावी. चेंगराचेंगरीचा प्रकार घडू नये, यासाठी देखाव्याचे पंडाल बंधिस्त न ठेवता मोकळ्या जागेत तयार करावे. गणपतीची स्थापना करणाऱ्या कोळी समुदायाला दरवर्षी लालबागच्या राज्याच्या विसर्जनाचा मान मिळावा. तसेच, दर्शनाचा एक दिवस आगरी-कोळी बांधवांसाठी राखीव ठेवावा, आदी मागण्याही मच्छीमार समितीनेकडून करण्यात आल्या आहेत.