मुंबई : कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. पण पोलिसांनी आंदोलनापूर्वीच १५ ते २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना दादर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. यावर एकिकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. हीच तत्परता कबुतरखान्याची तोडफोड करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी का दाखवली नाही, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे. तसेच कायदा न मानणारे, पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आज दादर कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारले होते. मात्र या आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. सकाळी ११ नंतर आंदोलक जमू लागले, यानंतर तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

कबुतरखाना बंदीचा विषय धार्मिक नाही. कबुतरखाना बंदीचा विषय हा सामाजिक आहे. त्यामुळे कबुतरखाना बंदीला जातीयवादाचा रंग देऊ नका. त्या दिवशी जैन समाजाने आंदोलन केले, त्यावेळी जैन समाजाच्या आंदोलकांवर काही कारवाई केली का, असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला. तसेच न्यायालया निर्णयाचा सन्मान करावा, असे आवाहन मराठी एकीकरण समितीने यावेळी केले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन दादर पोलीस ठाण्यात नेले.

यापूर्वी काय घडले?

दादर येथील कबुतरखान्याबाबत मोर्चा काढण्यासाठी जैन धर्मियांनी मुंबई पोलिसांकडे ५ ऑगस्टला परवानगी मागितली होती. पण याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे पोलिसांनी या आंंदोलनाला परवानगी नाकारली. त्यानंतर परवानगीशिवाय कोणतेही आंदोलन केले जाणार नाही. असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. पण ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास कबुतरखान्याजवळ मोठ्या संख्येने जैन धर्मिया आंदोलक जमले. २०० ते ३०० जणांचा जमाव तेथे जमला होता. त्यांनी घोषणाबाजी करीत थेट कबुतरखान्यावर घातलेली ताडपत्री काढून तेथे कबुतरांना खाद्य घातले.

यावेळी पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. यावेळी आंदोलक पोलिसांशी हुज्जत घालत होते. पोलिसांनी त्यांना अडवून कबुतरखान्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतरही आंदोलकांनी आतमध्ये शिरून आंदोलन केले. त्याचबरोबर कबुतरांसाठी आणलेले खाद्यदेखील त्यांनी तिथे पसरवून टाकले होते.