मुंबई : किंग्स सर्कल येथील के. ए. सुब्रमण्यम मार्गावरील त्रिधातू आरोह इमारतीमधील यांत्रिकी वाहनतळ सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक कोसळले. या दुर्घटनेत रहिवाशांच्या पाच मोटारगाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, त्या इमारतीला निवासी दाखला मिळालेला नसून त्यापूर्वीच इमारतीत रहिवासी वास्तवास आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बहुमजली इमारतींच्या कायदेशीर व सुरक्षा नियमांच्या पालनाबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या इमारतीमध्ये गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून रहिवासी वास्तव्यास आहेत. इमारतीला निवासी दाखला मिळालेला नसतानाही अनेकजण तेथे राहायला आले आहेत. सोमवारी सायंकाळी इमारतीतील यांत्रिकी वाहनतळ कोसळताच मोठा आवाज झाला. त्यांनतर नागरिकांना वाहनतळ कोसळल्याची माहिती मिळाली. संबंधित दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. त्यांनतर मातीचा ढिगारा हटवून तेथे कोणी अडकले नसल्याची खात्री झाल्यांनतर मदतकार्य थांबविण्यात आले. माटुंगा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या दुर्घटनेत एकूण पाच मोटारगाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित इमारतीला निवासी दाखला मिळालेला नाही. त्यामुळे इमारत व त्यासंबंधित अन्य माहिती महानगरपालिकेकडे उपलब्ध नाही. तसेच, इमारत प्रस्ताव विभागाला त्या इमारतीविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.