मुंबई : चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवर रविवारी आणि सोमवारी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) देण्यात आली आहे. या निर्णयानुसार रविवारी (२४ मार्च) वडाळा डेपो स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यानची सेवा सकाळपासून बंद राहणार असून रात्री ८ नंतर १ तासांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू होतील. संत गाडगे महाराज चौक ते वडाळा आगार या स्थानकांदरम्यानची सेवा मात्र सुरळीत राहणार आहेत. या फेऱ्या १८ मिनिटांच्या अंतराने सुरू राहणार असून रविवारी मोनोच्या एकूण ११४ फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविण्यात येणार आहे.
हेही वाचा : मुंबई विद्यापीठाचा ८५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर
सोमवारी (२५ मार्च) वडाळा आगार स्थानक ते चेंबूर स्थानकादरम्यान १ तासांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. तर वडाळा आगार ते संत गाडगे महाराज चौक स्थानकादरम्यान १८ मिनिटांच्या अंतराने मोनोच्या फेऱ्या सुरू राहणार आहेत. याप्रमाणे सोमवारी मोनोच्या एकूण १४७ फेऱ्यांचा माध्यमातून प्रवाशांना सेवा पुरविण्यात येणार आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखभाल दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.