मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून १४९ दुकानांच्या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती,बोली लावणे अशी प्रक्रिया १२ आॅगस्टपासून सुरु आहे. मात्र या दुकानांच्या ई लिलावासाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मुंबई मंडळाने ई लिलावपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ दिली होती. तर आता ही मुदत १० सप्टेंबरला संपणार असतानाच मंडळाने पुन्हा काही दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता इच्छुकांना ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरून १० सप्टेंबरला ई लिलावात सहभागी होता येणार आहे.
या मुदतवाढीमुळे ११ सप्टेंबरला जाहीर होणारा ई लिलावाचा निकाल आता १९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. मुलुंड गव्हाणपाडा येथे ०६ अनिवासी गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे ०५, तुंगा पवई येथे ०२, कोपरी पवई येथे २३, चारकोप येथे २३, जुने मागाठाणे बोरीवली पूर्व येथे ०६, महावीर नगर कांदिवली पश्चिम येथे ०६ अनिवासी गाळे, प्रतीक्षा नगर सायन येथे ०९, अँटॉप हिल वडाळा येथे ०३, मालवणी मालाड येथे ४६ अनिवासी गाळे, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे १७ अनिवासी गाळे व शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे प्रत्येकी एकाअनिवासी गाळ्याचा अर्थात दुकानांचा मंडळाने ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार १२ आॅगस्टपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती सुरु झाली असून २८ आॅगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार होती. तर २९ आॅगस्टला निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र या कालावधीदरम्यान अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मंडळाने ई लिलावपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ दिली. त्यानुसार ८ सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना नोंदणी करून अर्ज भरता येणार होता तर १० सप्टेंबरला बोली लावता येणार होती. ११ सप्टेंबरला निकाल जाहिर केला जाणार होता. मात्र ही मुदत संपण्यापूर्वीच ई लिलावपूर्व प्रक्रियेला मंडळाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी व अर्ज करणे, कागदपत्रे जमा करणे, संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम भरणे ही प्रक्रिया १६ सप्टेंबरला रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येणार आहे. तर १० सप्टेंबरपर्यंत अर्जदारांना बोली लावता येणार असून १९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता https://eauction.mhada.gov.in व https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.