मुंबई: भूतबाधा झाल्याचे सांगत एका दाम्पत्याने अडीच वर्षाच्या मुलाला चटके देऊन बेदम मारहाण केल्याची घटना भांडूप येथे घडली. याबाबत मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीवरून भांडूप पोलिसांनी गुन्हा दाखल करून दाम्पत्याला अटक केली.
भांडूपमधील जंगलमंगल रोड परिसरात आरोपी वैभव कोकरे (३५) याची बाटलीबंद पाणी विकण्याची एजन्सी आहे. याच एजन्सीमध्ये या पीडित मुलाची आई काम करीत होती. अनेकदा ती तिच्या अडीच वर्षांच्या मुलाला कामावर घेऊन येत होती. कामादरम्यान मुलगा वारंवार रडत होता. त्याला भूतबाधा झाल्याने तो रडत असल्याचे आरोपी वैभव आणि त्याची पत्नी हर्षदा यांनी त्याच्या आईला सांगितले. तसेच यावर आपल्याकडे उपाय असल्याचे सांगत, त्यांनी या मुलाला चटके दिले. तसेच त्याला लाकडी काठीने मारहाणही केली.
मुलाच्या आईने ही बाब तिच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ भांडूप पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला, पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी अघोरी प्रथा कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. तसेच पोलिसांनी मुलाला उपचारासाठी वाडिया रुग्णालयात दाखल केले असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.