मुंबई : नौदल अधिकाऱ्याची नग्नावस्थेत खोटी चित्रफीत तयार करून त्याच्याकडून अडीच लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी तिघांविरोधात कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याचे सांगूनही नौदल अधिकाऱ्याला धमकावले होते. याप्रकरणी खंडणी, फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत कफ परेड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

५१ वर्षीय तक्रारदार भारतीय नौदलात अधिकारी असून कुलाबा नेव्ही नगर परिसरात राहतात. तक्रारदाराची अनोखळी महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाली होती. त्यातून २४ ऑक्टोबरला तिने फेसबुक मेसेंजरवरून प्रथम संपर्क साधला. दोघांमध्ये बोलणे झाल्यानंतर तिने फेसबुकवरून व्हिडिओ कॉल केला. यावेळी ती महिला अश्लील चाळे करीत होती. आरोपी महिलेने तक्राराची नग्नावस्थेत खोटी चित्रफीत तयार केली. ती यूट्युबवर वायरल करण्याची धमकी देऊन प्रथम तक्रारदाराकडे ३१ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने सुरुवातीला रक्कम भरली. त्यानंतही आरोपी महिलेने आणखी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : रेल्वेमध्ये अल्पवयीन मुलाची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या महिलेच्या सांगण्यावरून तक्रारदाराने त्यानंतही विविध व्यवहारांद्वारे सुमारे ६४ हजार रुपये विविध खात्यांवर, तसेच ई-व्हॉलेटमध्ये जमा केले. त्यानंतर महिलेने घरी पोलीस पाठवून अटक करण्याची धमकी दिली व दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराला सीबीआय अधिकारी व यूट्युब कर्मचाऱ्याच्या नावानेही दूरध्वनी आले होते. तक्रारीनुसार नौदल अधिकाऱ्याकडून दोन लाख ५० हजार ४९९ रुपये घेतले आहेत. याप्रकरणी नौदल अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून तीन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांनी रक्कम जमा केलेले बँक खाते व ई व्हॉलेटची माहिती मागवण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.