मुंबई : राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या (एनटीसी) अखत्यारितील गिरण्यांच्या जागेतही आता गिरणी कामगारांना घरे मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्यात येणार आहे. याबाबत नगरविकास विभागाने मसुदा जारी केला असून हरकती व सूचना सादर करण्यासाठी महिन्याभराची मुदत देण्यात आली आहे. ही सुधारणा मंजूर झाली तर एनटीसी गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना ४०५ चौरस फुटाचे घर मिळणार आहे.
मुंबईत ५८ गिरण्या असून त्यापैकी दहा गिरण्यांमध्ये म्हाडाच्या वाट्याला एकही घर आलेले नाही. उर्वरित गिरण्यांच्या पुनर्विकासात म्हाडाला गिरणी कामगारांसाठी २८ हजारच्या आसपास घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठी पावणेदोन लाख गिरणी कामगार वा त्यांच्या वारसांनी म्हाडाकडे अर्ज केले आहेत. या सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळणे आता अशक्य आहे. उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना झोपडपट्टी पुनर्विकासात घरे देण्याची घोषणा केली. मात्र त्याबाबत शासनाने अद्याप धोरण निश्चित केलेले नाही. त्यामुळे आता गिरणी कामगारांपुढे आता मुंबईबाहेरील परिसर हाच पर्याय राहिला आहे.
एनटीसी गिरण्यांच्या जागांवर असलेल्या ११ चाळींतील रहिवाशांना पुनर्विकासात घर उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने सतत पाठपुरावा केला होता. अखेर गिरण्यांच्या जागेवरील चाळींतील रहिवाशी ४०५ चौरस फुटाच्या घरासाठी पात्र असले तरी त्या मोबदल्यात विकासकाला प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्रफळ उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे या इमारती वा चाळींच्या पुनर्विकासासाठी विकासक पुढे येत नव्हते. अखेरीस राज्य शासनाने विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करणारा मसुदा जारी केला आहे. या मसुद्यानुसार एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील इमारती वा चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी लागणारे चटईक्षेत्रफळ आणि त्यानुसार प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्रफळ देण्यात येणार आहे. या पुनर्विकासासाठी या नियमावलीनुसार चार इतके चटईक्षेत्रफळ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
पुनर्वसनासाठी लागणारे चटईक्षेत्रफळ आणि प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्रफळ यापैकी जे जादा असेल ते या पुनर्विकासात आता विकासकाला उपलब्ध होणार आहे. प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्रफळ हे भूखंड दर आणि बांधकाम दर यांच्या मूळ प्रमाणानुसार ७५ ते ८० टक्के प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्रफळ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे आता एनटीसी गिरण्याच्या आवारात उत्तुंग इमारतींचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी पुनर्वसनाच्या इमारतीचा देखभाल खर्च शून्य असावा व कॉर्पस निधी, पार्किंग तसेच संक्रमण शिबिरात व्यवस्था आदींबाबत आपण सूचना करणार असल्याचे संघाचे अध्यक्ष व आमदार सचिन अहिर यांनी सांगितले.
एनटीसी गिरण्या व कंसात म्हाडाला मिळणारा वाटा चौरस मीटरमध्ये
अपोलो (९२८५.८४), मुंबई (१२३५८.२७), ज्युपिटर (१२२८.६३), एलफिस्टन (२८७३.२२), कोहिनूर मिल नंबर तीन (२८९५.७४), इंडिया युनायटेड नंबर २ व ३ (७९२६.८८), न्यू हिंद टेक्स्टाईल (२१९९.४१) आणि भारत (१९३८.१२).