मुंबई : अल्पवयीन मुलीवर तिच्या शिक्षिकेच्या पतीने अत्याचार केल्याची गंभीर घटना पूर्व उपनगरात घडली आहे. पीडित मुलगी अरबी भाषा शिकण्यासाठी आरोपीच्या पत्नीकडे जात होती. त्यावेळी आरोपीने तिच्यावर अत्याचार करून हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलगी गरोदर असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ३१ वर्षीय आरोपीला गुरूवारी पहाटे अटक केली आहे. त्याच्याविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्या(पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार मुलगी कुटुंबियांसोबत पूर्व उपनगरात राहते. ती अरबी भाषा शिकण्यासाठी एका महिलेकडे जायची. तसेच पीडित मुलगी एक दिवस या महिलेच्या घरीही राहिली होती. त्याचा फायदा उलचून आरोपीने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला. डिसेंबर महिन्यात प्रथम हा प्रकार घडला. आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केल्यानंतर हा प्रकार कोणालाही न सांगण्यासाठी तिला धमकावले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती.

पीडित मुलगी गरोदर झाल्यानंतर हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्कार व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यांतर पोलिसांनी मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला गुरूवारी पहाटे अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अल्पवयीन मुलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ

मुंबईत अल्पवयीन मुले व मुली यांच्याविरोधात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईत २०२४ मध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्या अंतर्गत १३४१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२३ पोक्सो कायद्या अंतर्गत ११०८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये मुंबईत पोक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये ६०९ बलात्कार, ६६७ विनयभंग व ३५ छेडछाड-अश्लील शेरेबाजी केल्याच्या घटनांचा समावेश आहे. २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांतील ९९ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते.