मुंबई: घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर गुरुवारी दुपारी पंतनगर पोलिसांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. तपासात हा मृतदेह विलास राजे (५४) या पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याचे समोर आले असून पंतनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास एक इसम गंभीर अवस्थेत रेल्वे स्थानक परिसरातील स्कायवॉकवर असल्याची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी इसमाला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पंतनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत मृताच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता, विलास राजे (५४) हे ११ जूनपासून घरातून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. राजे हे मुंबई पोलीस दलातील नायगाव येथील सशस्त्र पोलीस विभागात कार्यरत होते.
घाटकोपरच्या जव्हार पोलीस लाईनमध्ये राजे हे कुटुंबियांसोबत राहत होते. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला अनेक वर्षांपासून त्यांना दारुचे व्यसन असल्याने अनेकदा ते घरातून निघून जात होते. प्राथमिक तपासात दारूच्या सेवनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.