मुंबईः गोराई येथे तुकडे झालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतले असून हातावर गोंदवलेल्या इंग्रजी अक्षरांमुळे या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मृत व्यक्तीचे आंतरधर्मिय अल्पवयीन मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. पण मुलीने सर्व संबंध तोडले होते. त्यानंतरही तो तिला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. त्यावरून झालेल्या वादातून सदर तरुणाची हत्या झाल्याचा संशय आहे. याप्रकरणातील इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मृत व्यक्तचे नाव रघुनंदन पासवान (२१) असून तो बिहार दहभंगा येथील कानहोळी गावातील रहिवासी आहे. त्याच्यासोबत मुंबईत आलेला रघुनंदनचा मित्रही या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असून याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. १७ वर्षांच्या मुलीचे रघुनंदन पासवानसोबतचे प्रेमसंबंध तोडले होते. त्यानंतर तिच्या भावांनी तिला मुंबईत आणले. पण पासवान तिला भेटण्यासाठी मुंबईत आला होता. त्यामुळे मुलीचे कुटुंबिय संतप्त झाले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. ही हत्या भाईंदरमध्ये झाली आणि मुलीच्या भावांनी एका ऑटो-रिक्षामधून मृतदेह गोराईला आणला व तेथे फेकून दिला. याप्रकरणी रिक्षाचालकाचीही ओळख पटली असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

रघुनंदनच्या उजव्या हातावर ‘आरए’ अशी इंग्रजी अक्षरे गोंदवली होती. त्याद्वारे रघुनंदच्या वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्या मुलीचे नाव ‘ए’वरून सुरू होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आंतरधर्मीय प्रेमसंबंधामुळे मुलीच्या नातेवाईकांनी रघुनंदनची हत्या केल्याचा संशय त्याचे वडील जितेंद्र पासवान यांना व्यक्त केला आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जितेंद्र यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर हातावर गोंदवलेल्या अक्षरांच्या आधारे रघुनंदनच्या वडिलांनी मुलाचा मृतदेह ओळखला. याप्रकरणी मुलीच्या दोन भावांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले. रघुनंदन पुण्यात एका खाजगी कंपनीत काम करीत होता आणि दिवाळीच्या सुट्ट्यीत घरी आला होता. रघुनंदन शिक्षण सोडून पुण्यात राहत होता. बिहारमधील एका रुग्णालयात काम करीत असताना त्याने एका मुलीला काही औषधे मिळवून देण्यासाठी मदत केली होती. तेव्हापासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. नंतर मुलीच्या कुटुंबाला हे समजले आणि तिच्या मोठ्या भावाने माझ्या मुलाला धमक्या दिल्या, असाही आरोप रघुनंदनच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

त्यावेळी त्यांनी त्यांच्या गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मदत घेतली आणि मुलीच्या कुटुंबाशी बोलून या प्रकरणात मध्यस्थी करण्यास सांगितले. त्यानंतर रघुनंदला त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयातील नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तो गेल्या आठ महिन्यांपासून पुण्यात एका खाजगी कंपनीत काम करीत होता.

हेही वाचा : गिरणी कामगारांकडून पाच हजार रुपये उकळणे महागात; वांगणीतील विकासकाला कारणे दाखवा नोटीस, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून कारवाई

३१ ऑक्टोबर रोजी तो अचानक घरातून निघून गेला आणि त्याने मित्रांसोबत मुंबईला जाणार असल्याचे सांगितले. त्याचा फोन बंद झाला. रघुनंदनशी संपर्क होऊ न शकल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी पुण्यात जाऊन त्याचा शोध घेतला आणि नंतर ते अंधेरी येथे पोहोचले, जिथे त्याचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर जितेंद्र यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात रघुनंदन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

मुलीच्या भावांनी इतर काही व्यक्तींसोबत कट रचला होता. त्यांनी माझ्या मुलाला पुण्यात बोलावले आणि त्याला मुंबईत फिरायला नेण्याच्या बहाण्याने अंधेरीत आणले. नंतर त्याला गुंगीचे औषध देऊन ठार मारले, असा आरोप पासवान कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘त्या’ युवराजाला जनता कंटाळली, आता हा ‘राज’पुत्र काय करणार?, सदा सरवणकरांच्या मुलीची दोन्ही ठाकरेंवर जोरदार टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोराईत सापडला होता मृतदेह

गोराई परिसरातील शिफाली गावातील बाबरपाड्यातील रहिवाशांना रविवारी एका गोणीमधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी गोणी उघडली असता त्यात अज्ञात व्यक्तीच्या शरीराचे तुकडे सापडले. गोराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांखाली हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा स्वतःहून नोंदवला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी याप्रकरणाचा तपास करीत आहेत.