मुंबई : मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील रहेजा टॉवरचे बांधकाम सुरू असून या इमारतीच्या शौचालयाच्या टाकीमध्ये बुधवारी तीन कामगार पडले. या कामगारांना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शौचालयाच्या टाकीतून बाहरे काढण्यात आले. या तीनही कामगारांना जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
मालाड (प.) परिसरातील राणी सती मार्गावरील रत्नागिरी हॉटेल जवळच असलेल्या रहेजा टॉवर या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या आवारातील शौचालयाच्या टाकीत चार कामगार पडले. ४० फूट खोल असलेल्या या टाकीत चार कामगार सफाईच्या कामासाठी उतरले होते. मात्र बराच वेळ हे कामगार बाहेर न आल्यामुळे अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली. अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी पोहोचल्यानंतर कामगारांचा शोध घेण्यात आला. शौचालयाच्या टाकीत तीन ते चार कामगार उतरल्याची माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्याआधारे कामगारांचा शोध घेऊन तीन कामगारांना बाहेर काढून जोगेश्वरीतील पालिकेच्या ट्रामा केअर रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यापैकी राजू (५०), जावेद शेख (३५) या दोघांचा मृत्यू झाला. तर अकीब शेख (१९) याची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा…मुंबईत सोन्याच्या तस्करी प्रकरणी चौघांना अटक, डीआरआयकडून १०.५० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान, रहेजा टॉवर ही खासगी इमारत असून इमारतीच्या बांधकामादरम्यान सेफ्टीक टँक स्वच्छ करण्यासाठी खासगी कंत्राटदाराने हे कामगार आणले होते. कामगारांना शौचालयाच्या टाकीत उतरण्यास कायद्याने मनाई असताना खासगी कंत्राटदाराने कामगारांना कोणतीही सुरक्षिततेची साधने न देता टाकीत उतरवल्यामुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.