मुंबई : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विविध १०० बांधकामाच्या ठिकाणी ‘प्रयास’ नामक नाटकाचे पहिले सत्र पूर्ण केले. मुंबई बुलेट ट्रेन स्थानक ते अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत सुरू झालेल्या पथनाट्यांमध्ये सहा हजारांहून अधिक कामगारांना सुरक्षेचे धडे देण्यात आले.

बुलेट ट्रेनच्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि कामगारांना आकर्षक पद्धतीने शिक्षित करण्यासाठी ‘प्रयास’ या नाटकाची मालिका सुरू केली आहे. कास्टिंग यार्ड, बोगद्याचे खांब, निर्माणाधीन स्थानके, डेपो, पूल आणि वायडक्ट या बांधकामाच्या ठिकाणी ही मालिका दाखवली जाते. यात उपकरणांचा योग्य वापर, सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन, आपत्कालीन प्रतिसाद प्रक्रिया आणि सुरक्षित कामाचे वातावरण राखण्याचे महत्त्व यांसारख्या प्रमुख सुरक्षा विषयांचा समावेश करण्यासाठी सादरीकरणांची रचना केली जाते.

हेही वाचा : गरीबरथ एक्स्प्रेसला ‘एलएचबी’ डबे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या उपक्रमाचा उद्देश उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरात या विविध भागातील आणि वैविध्यपूर्ण भाषिक पार्श्वभूमी असलेल्या कामगारांसाठी नाटक पाहून समजणे शक्य होणार आहे. हे सुनिश्चित करून पथनाट्यांची भाषा साधी आणि समजण्यास सोपी ठेवली आहे. कामगारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि सुरक्षिततेचे संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पथनाट्यांमध्ये नाटक, विनोद आणि संबंधित दृश्यांचा समावेश केला जातो. बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर पुढील सहा महिने ही मोहीम सुरू राहील, असे एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार गुप्ता यांनी सांगितले.